ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक घेऊन दिवा शहराला दैनंदिन ६.५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पुरवण्याबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करुन दिव्याला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आजपासून वाढीव पाणीपुरवठा देण्यास सुरूवात केली आहे.
दिवा परिसरामधील वाढती लोकसंख्या विचारात घेता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचेकडून सद्य:स्थितीत होणारा पाणी पुरवठा अपुरा पडत होता, त्यामुळे त्या परिसरामध्ये भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागत होते. ठाणे शहरातील पाणी समस्या सोडविण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर बैठक आयोजित केली होती. या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र पाटक, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमारसिंह, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भुषण गगराणी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन, ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, ठाणेचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी.एन.बल्गन, यांचेसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत संपूर्ण महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत होत असलेल्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. ठाणे शहराला होणारा अपुरा पाणीपुरवठा विचारात घेऊन, ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी तानसा आणि बारवी धरणातून ५० दशलक्ष लिटर प्रतिदिन आणि मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातील २० दशलक्ष लिटर प्रतिदिन प्रक्रिया केलेले पाणी कोपरी व वागळे इस्टेट परिसराला उपलब्ध करुन देणेबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. तसेच दिवा विभागासाठी पुरेसा व नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी देखील भातसा धरणातून ठाणे महानगरपालिकेला ६.५० दशलक्ष लिटर प्रतिदिन इतका वाढीव पाणी पुरवठा जलसंपदा विभागाने वितरीत करावा तसेच ठाणे महानगरपालिकेने स्वतःच्या योजनेतून ६.५० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना वागळे परिसराकरिता उपलब्ध करुन, त्या बदल्यात बार्टर पध्दतीने दिवा परिसराकरिता ६.५० दशलक्ष लिटर प्रतिदिन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने वाढीव पाणी पुरवठा त्वरीत करावा, असा निर्णय सुध्दा मा. मुख्यमंत्री यांनी घेतला. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून भातसा धरणातून ६.५ दशलक्ष लिटर प्रति दिन वाढीव पाणी पुरवठा त्वरीत सुरु करण्यात आला आहे. तसेच बार्टर पध्दतीने पाणी पुरवठा करणेकरिता आवश्यक ती नळ जोडणी, मीटर बसविणे इ. कार्यवाही करुन, नुकतेच खासदार श्रीकांत शिंदे यांचे हस्ते ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या योजनेतून ६.५ दशलक्ष लिटर प्रति दिन पाणी पुरवठा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचेकरिता सुरु करण्यात आला आहे. यावेळी माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक अशोक वैती, एकनाथ भोईर, राम रेपाळे, शरद कणसे, रमाकांत मढवी आदी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे अधिक्षक अभियंता श्री. चव्हाण, कार्यकारी अभियंता श्री. राठोड तसेच ठाणे महानगरपालिकेचे उपआयुक्त मनिष जोशी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा व अति नगर अभियंता अर्जुन अहिरे इत्यादी उपस्थित होते.