राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाची कारवाई
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्रीवर लक्ष ठेवून असणाऱ्या उत्पादन शुल्क ठाणे विभागाने महापे परिसरात खाद्य पदार्थांच्या खोक्यात छुप्या पद्धतीने लपवलेल्या विदेशी मद्याच्या १४६ सीलबंद बाटल्या आणि ९६ कॅन्सवर छापा टाकून वाहन आणि मद्य मिळून सुमारे १४ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना सर्वच आस्थापनाना प्रशासनाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने आपल्या सर्व विभागांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. त्यानुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सर्व्हिस रोड, इलेक्ट्रिक झोन टी. सी. सी. इंडस्ट्रियल एरिया महापे या ठिकाणी अवैध मद्य एका टेम्पोतून येणार असल्याचे समजले.
उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सह आयुक्त सुनील चव्हाण, उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. यावेळी हल्दीराम खाद्य पदार्थांच्या बॉक्समध्ये दडवलेले विदेशी मद्य आणि बियरचे कॅन आढळून आले असल्याची माहिती विभागाचे जिल्हा अधिक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी दिली.
विभागाचे कर्मचारी परिसरात गस्त घालत असताना, एका तीन चाकी टेम्पोत हळदीराम खाद्य पदार्थांच्या बॉक्स ठेवले होते. दरम्यान मिळालेल्या माहिती आधारे सदरच्या बॉक्समध्ये विदेशी मद्याच्या १४८ स्कॉचच्या सीलबंद बाटल्या आणि बियरचे ९६ कॅन्स आढळून आले. खाद्य पदार्थांच्या बॉक्समध्ये व्यवस्थित पॅकिंग करून त्यावर सेलो टेप चिकटवली होती. तीन चाकी टेम्पोत भरलेले अवैध मद्य एका मोठ्या टेम्पोत टाकताना सदरची कारवाई करण्यात आली आहे. मद्य आणि वाहन मिळून १४ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई करताना राज्य उत्पादन शुल्क ई विभाग नवी मुंबईच्या दुय्यम निरीक्षक ज्योत्स्ना पाटील, एन. एच. गोसावी, ज्योतिबा पाटील, संदीप धुमाळ आदी अधिकारी आणि कर्मचारी होते.