डॉक्टर नसल्यामुळे आयसीयु सिरियस

ठाणे: कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील २० खाटांच्या अतिदक्षता विभागातील रुग्णांचा भार केवळ एकाच इंन्टेसिव्हिस्ट या तज्ज्ञ डाॅक्टरावर असल्याने अतिदक्षता विभागातील रुग्णांची स्थिती सिरीयस झाली आहे.

रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या इंन्टेसिव्हिस्ट तज्ञ डॉक्टरांच्या १२ पैकी ११ जागा रिक्त असल्याची माहिती हाती आली आहे. यामुळे एकाच इंन्टेसिव्हिस्ट या तज्ज्ञ डाॅक्टरच्या खांद्यावर अतिदक्षता विभागाचा भार असून ही रिक्त पदे भरण्यासाठी पालिकेने आता भरती प्रक्रीया सुरू केली आहे.

ठाणे महापालिकेचे कळवा परिसरात पाचशे खाटांचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे. या रुग्णालयात ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेकडो गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत रुग्णालय अपुरे पडू लागले आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णालयाची क्षमता पाचशे खाटांवरून एक हजार खाटांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. रुग्णालयात सुसज्ज प्रसुती कक्ष आणि शस्त्रक्रीया विभागाची उभारणी करून त्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. रुग्णालयात वाचनालयही सुरु करण्यात आले आहे. याशिवाय, २० खाटांचा अतिदक्षता विभागही सुरु करण्यात आला असून या कक्षात आणखी २० खाटा वाढविण्यात येणार आहे. असे असतानाच दुसरीकडे मात्र एकाच इंन्टेसिव्हिस्ट या तज्ज्ञ डाॅक्टरच्या खांद्यावर अतिदक्षता विभागाचा भार असल्याची बाब समोर आली आहे.

रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी इंन्टेसिव्हिस्ट या पदाचे तज्ज्ञ डाॅक्टर नेमले जातात. परंतु कळवा रुग्णालयातील २० अतिदक्षता विभागाकरिता १२ इंन्टेसिव्हिस्ट पदे मंजुर आहेत. प्रत्यक्षात येथे एकच इंन्टेसिव्हिस्ट कार्यरत आहे. तर, उर्वरित ११ जागा रिक्त आहेत.

कळवा रुग्णालयातील चार निवासी डाॅक्टर, इतर विभागाचे प्रमुख तज्ज्ञ डाॅक्टर हे अतिदक्षता विभागातील रुग्णांवर उपचार करतात. यामुळे डाॅक्टरांवरही अतिरिक्त भार पडत आहे. याशिवाय, याठिकाणी प्रशिक्षत तज्ज्ञ परिचारिका आणि आरोग्यसेवकांची कमतरता आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आता इंन्टेसिव्हिस्ट पदाच्या ११ रिक्त जागा भरण्याची प्रक्रीया सुरू केली असून त्यासाठी जाहिरात काढली आहे. याबाबत पालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांच्याशी संपर्क साधला असता, या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला.