दौंड: दौंड तालुक्यातील वरवंड येथून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने आपल्या पत्नीचा गळा आवळून आपल्या दोन मुलांना विहिरीत ढकलून देत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण दौंड तालुका हादरला आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. वरवंड येथील गंगासगर पार्कमध्ये रूम नंबर २०१ मध्ये राहत्या घरी ही घटना घडली आहे.
डॉ.अतुल दिवेकर (४२) आणि पत्नी पल्लवी (३५) यांचे मृतदेह यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत घरी सापडले असून मुलगा अद्वित अतुल दिवेकर (११) आणि मुलगी वेदांतिका अतुल दिवेकर (७) यांचे मृतदेह विहिरीत आढळले आहेत. विहिरीत ४५ फूट एवढे पाणी असल्याने मुले वर काढण्यात मोठी अडचण येत होती. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
या घटनेने वरवंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अचानक घडलेल्या घटनेने वरवंड गावावर शोककळा पसरली आहे. डॉ. अतुल दिवेकर हे व्यवसायाने गुरांचे डॉक्टर असून त्यांची पत्नी ही एका शाळेत शिक्षिका असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना घटनस्थळावरून सूसाईड नोट मिळाली असून पुढील तपास करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.