मालमत्ता विक्री प्रदर्शनाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
ठाणे : कोरोना संकटामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर क्रेडाई एमसीएचआय ठाणे तर्फे आयोजित केलेल्या मालमत्ता विक्री प्रदर्शनाला गेल्या चार दिवसांत ठाणे-मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिकांनी भेटी दिल्या. प्रदर्शनात दोनशेहून जास्त सदनिकांचे आरक्षण झाले असून विविध बँकांनी सुमारे ७५० कोटींची कर्जे मंजूर केली आहेत.
प्रदर्शनात २९ लाखांच्या पुढील वन बीएचकेची तर ९१ लाखांच्यापुढे टू बीएचकेच्या घरांचे पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले होते. एकूणच परवडणाऱ्या घरांपासून ते मोठी आलिशान घरे असे सर्वच पर्याय प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आले होते. याशिवाय प्रदर्शनात विविध बँका आणि वित्त संस्थेच्या माध्यमातून गृह कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
प्रदर्शनात ठाणे शहरातील हरिनिवास, घोडबंदर परिसर, भांडुप, मुलूंड आणि भांडूप परिसरातील गृह प्रकल्प मांडण्यात आले होते.. त्यात सर्वाधिक घोडबंदर भागातील प्रकल्पांचा समावेश आहे. ३२० चौरस फुटांपासून ते ४५० चौरस फुटांपर्यंतची १ बीएचके घरे विक्रीसाठी ठेवण्यात आलेली होती, त्यांच्या किमती २९ लाखांच्या पुढे होत्या. त्यापैकी अनेक प्रकल्पात उद्यान, व्यायामशाळा तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सहाशे चौरस फुटांच्या पुढील २ बीएचकेच्या घरांचा पर्यायही देण्यात आला होता. या घरांच्या किमती ९१ लाखांच्या पुढे होत्या. यातील काही प्रकल्पात आकर्षक फर्निचर, नामांकित कंपन्यांच्या साहित्यांचा वापर करून आलीशान घरे बनविण्यात आलेली आहेत. याशिवाय, त्यापेक्षाही मोठ्या घरेही प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. एकूणच परवडणाऱ्या घरांपासून ते मोठी आलिशान घरे असे सर्वच पर्याय प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
प्रदर्शनात गेल्या चार दिवसांत ८९५० नागरिकांनी भेटी दिल्या. तर १३,५०० नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. यापैकी ३,७०० नागरिकांनी प्रत्यक्ष साईटवर जाऊन पाहणी केली. त्यातील २२१ नागरिकांनीसदनिक आरक्षित केल्या. तर विविध बँका आणि वित्तीय संस्थांनी इच्छुक ग्राहकांना गृह खरेदीसाठी ७५० कोटींची कर्जे मंजूर केल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध मोठ्या प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. त्यातील काही प्रकल्प स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबविले जात आहेत. अशा प्रकल्पांची मांडणी महापालिकेने प्रदर्शनात केली आहे. त्यात डिजी ठाणे, स्मार्ट जलमापके, सीसीटिव्ही आणि वायफाय यंत्रणा, कॅमेऱ्यांसाठी नियंत्रण कक्ष, पदपथ, सार्वजनिक वाहतूक सुविधा, पाणी पुरवठा योजनेची पुनर्बांधणी, अर्बन रेस्ट रुम, सौर उर्जा, मलनि: सारण प्रकल्प, गावदेवी भुयारी वाहनतळ, खाडी किनारा सुशोभिकरण, नवीन स्थानक, मासुंदा तलावाभोवती काचेचा पदपथ, तलावांचे सुशोभीकरण, ठाणे पुर्व सॅटीस, अशा प्रकल्पांचा समावेश आहे. विविध सुविधा आणि प्रस्तावित योजना यामुळे ठाण्याला प्रथम पसंती दिली जात असल्याची माहितीही आयोजकांनी दिली.