बदलापुरात डोंगरावरील वणव्याची धग संपेना

बदलापूर – शहराजवळ असलेल्या टाहुलीच्या डोंगरावर गेल्या आठ दिवसांपासून वणवा पेटत आहे. डोंगराच्या वेगवेगळ्या भागांमधून अनेकदा आग आणि धुराचे लोट पहायला मिळतात. रविवारी कात्रप शेजारील डोंगरावर धुराचे लोट दूरवरून दिसून येत होते. बदलापूर वनक्षेत्रपाल प्रमोद ठाकर यांना विचारले असता डोंगरावर वणवा पेटल्याची कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. माहिती आल्यास कारवाई करण्याचे उत्तर दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील वनक्षेत्रात लागलेल्या वणव्यांचे सत्र संपताना दिसत नाही. रविवारी अंबरनाथ तालुक्यातील टाहुलीच्या डोंगरावर आणि कल्याण तालुक्यातील नाळींबी गावाजवळच्या डोंगरावर मोठा वणवा पेटला होता. याची तीव्रता इतकी होती  की दूरदूरवर हा वणवा दिसत होता. याबाबत काही पर्यावरणप्रेमींनी वन विभागाला माहिती दिली होती. मात्र त्यानंतरही तो विझवण्यासाठी काही ठोस हालचाली होऊ शकल्या नाहीत. परिणामी मोठी वनसंपदा या वणव्यात जळून खाक झाली आहे.

अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात मोठी जंगल संपदा आहे. एकीकडे टाहुलीची डोंगरराग तर दुसरीकडे अंबरनाथ आणि कल्याण तालुका विभागणारी डोंगरांची रांग दोन्ही तालुक्याच्या निसर्गसंपदेत भर घालते. गेल्या काही वर्षात येथील जंगल संपन्न होत असल्याने येथील प्राणी, पक्षांचा जंगलातील वावर वाढला आहे. ही जंगल संपदा वाढवण्यासाठी पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, संघटनाही प्रत्यक्ष काम करत आहेत. त्यामुळे एकीकडे वृक्षारोपण आणि संवर्धनाचे काम सुरू असताना दुसरीकडे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विविध  डोंगरांवर वणवे लागण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.