उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत गुवाहाटीत

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला दिवसेंदिवस धक्के बसत आहेत. आज सकाळपासून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे नॉट रिचेबल होते. त्यानंतर आता ते गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती पुढे आली आहे.
उदय सामंत यांच्या रूपाने शिवसेनेतील आणखी एक मंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होणार झाला आहे. त्यामुळे विधानसभेत निवडून आलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांपैकी आदित्य ठाकरे हे एकमेव मंत्री शिल्लक आहेत. उदय सामंत हे आदित्य ठाकरेंच्या जवळचे मानले जातात.
बंडखोर नेते एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीत सध्या नऊ मंत्री आहेत. तर आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे एकमेव विधानसभेत निवडून आलेले मंत्री उरले आहेत. त्यामुळे शिवसेनेतील आमदार आणि मंत्र्यांना थांबवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला अपयश येताना दिसत आहे. एकापाठोपाठ एक शिवसेनेतील मंत्र्यांनी गुवाहाटीचा रस्ता धरला. त्यामुळे शिवसेनेचे अख्ख मंत्रिमडळं रिकामं झालं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलेलं की बंडखोर मंत्री आणि आमदारांवर कारवाई होणार, आता या मंत्र्यावर कशा पद्धतीने कारवाई केली जाणार हे पाहावं लागणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या बंडखोरांच्या गटात सामील झालेले उदय सामंत हे शिवसेनेचे नववे मंत्री आहेत.
ते ९ मंत्री कोण?
एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्री
उदय सामंत – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा मंत्री
संदीपान भुमरे – रोजगार हमी मंत्री
शंभुराज देसाई – गृहराज्य मंत्री
अब्दुल सत्तार – राज्यमंत्री
बच्चू कडू – राज्यमंत्री
दादा भूसे – कृषिमंत्री
राजेंद्र यड्रावकर – राज्य आरोग्यमंत्री