भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार हद्दीत एका 21 वर्षीय विवाहित महिलेचा चालत्या प्रवासी इको कारमध्ये विनयभंग करत तिच्या १० महिन्याच्या मुलीला बाहेर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत या बालिकेचा मृत्यू झाला असून सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे.
संबंधित घटना ही शनिवार 10 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास विरार फाटा येथे घडली. या घटनेत महिलाही जखमी झाली असून वसई विरार महापालिकेच्या तुलिंज रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेप्रकरणी कलम 302, 354 अंतर्गत गुन्हा दाखल करत असल्याची माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफ्फुल वाघ यांनी फोनवर दिली.
पीडित महिला ही आपल्या 10 महिन्याच्या मुलीला घेऊन, नालासोपारा पेल्हार फाटा येथून इको कारमध्ये (जीजे १५-पीजे ११३७) बसून आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती. काही अंतरावर पुढे गेल्यानंतर कारमधील इतर नराधमांनी तिच्याशी असभ्य वर्तन करीत तिची छेड काढली. आरोपींनी पीडितेच्या 10 महिन्यांच्या बाळाला बाहेर फेकले. त्याला वाचवण्यासाठी महिलेनेही गाडीतून बाहेर उडी मारली. त्यात ती जखमी झाली तर तिच्या बाळाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
दरम्यान, महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी त्याच इको कारमध्ये पीडित महिला आणि मुलीला घेऊन तुळींज येथील रुग्णालयात दाखल केले, पण मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.