ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात जगभरातील कलाकारांना मानवंदना देताना लता मंगेशकर यांचं नाव वगळलं

ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यावर भारतीय नाराज

ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. ऑस्करनंतर आता नुकतीच यंदाच्या ग्रॅमी पुरस्कारांची घोषणा झाली. सध्या या पुरस्कारांची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेच. पण त्यासोबतच चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे स्वर्गीय गायिका लता मंगेशकर यांनी या पुरस्कार सोहळ्यात न देण्यात आलेली मानवंदना. मागच्या वर्षभरात निधन झालेल्या जगातल्या सर्व कलाकारांना नुकत्याच पार पडलेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात मानवंदना देण्यात आली मात्र यात लता मंगेशकर यांचं नाव मात्र नव्हतं. यामुळे भारतीय चाहत्यानी ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

ऑस्करनंतर, ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यातही भारतीय पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचं नाव ‘इन मेमोरिअम’ विभागातून वगळण्यात आलं. विशेष म्हणजे अकादमी पुरस्कारांच्या ‘इन मेमोरिअम’ विभागाच्या यादीतही लतादीदींचं नाव नव्हतं. यामुळे त्यांचे चाहते हैराण झाले आहेत. ग्रॅमी २०२२ ‘इन मेमोरिअम’ विभागात दिवंगत संगीतकार स्टीफन सोंधेम यांच्या गाण्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सिंथिया एरिव्हो, लेस्ली ओडोम जूनियर, बेन प्लॅट आणि रॅचेल झेगलर यांनी त्यांची गाणी सादर करत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. याशिवाय टेलर हॉकिन्स आणि टॉम पार्कर यांच्याही आठवणींना उजाळा देण्यात आला. मात्र यात लता मंगेशकर यांचं नाव घेण्यात आलं नाही.

अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या वेळीही दिवंगत भारतीय अभिनेता दिलीप कुमार आणि लता मंगेशकर यांच्या नावाचा उल्लेख ‘इन मेमोरिअम’ विभागात झाला नव्हता. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर असून, ‘लतादीदी आणि दिलीप कुमार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते, ज्याकडे या मानाचे पुरस्कार देणाऱ्या संस्थांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं’ असं चाहत्यांनी म्हटलं आहे. ‘हे अपेक्षित नव्हतं मात्र यामुळे आम्हाला आश्चर्य अजिबात वाटलं नाही’ असंही काही चाहत्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान ही गोष्ट यावर्षी प्रकर्षानं जाणवण्याचं कारण म्हणजे मागच्या वर्षी अकादमीनं त्यांच्या ‘इन मेमोरिअम’ विभागात दिवंगत अभिनेता, इमरान खान, ऋषी कपूर, सुशांत सिंह राजपूत यांच्या नावांचा उल्लेख करत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. मात्र लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांचं कलासृष्टीत एवढं मोठं योगदान असताना त्यांच्या नावाचा उल्लेखही न करणं भारतीयांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय आणि यावरून नाराजी देखील व्यक्त केली जातेय.