आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत क्रिशा शहाला सुवर्णपदक

ठाणे : ठाणेकर आर्टिस्टिक जिम्नॅस्ट क्रिशा जतीन शहाने इजिप्तची राजधानी कैरो येथे झालेल्या फहारोझ कप आंतरराष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भरीव कामगिरी करताना सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
प्री ज्युनियर गटासाठी जागतिक पातळीवरील महत्वाच्या या स्पर्धेत क्रिशाने टेबलव्हॉल्ट प्रकारात अव्वल स्थान मिळवले. यात क्रिशाने
११.८५० गुणांची कमाई करताना सुकारा प्रकाराचे (हवेत कोलांटी उड्या मारुन कुठलीही चुक न करता जमिनीवर पाय टेकवले जातात) अचूक सादरीकरण करत इतर स्पर्धकांना मागे टाकले. फेडरेशन इंटरनशनल जिम्नॅस्टिक्स यांच्या मान्यतेने इजिप्त जिम्नॅस्टिक्स फेडरेशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ८ देशातील १८२ युवा जिम्नॅस्ट सहभागी झाले होते
जिम्नॅस्टिक्स सेवाभावी संस्थेतर्फे पाच जणांचा संघ स्पर्धेत उतरला होता. त्यात क्रिशाने देशासाठी सुवर्णपदक जिंकले. याआधी मायदेशात विविध राष्ट्रीय, राज्यपातळीवर आपली छाप पाडणारी क्रिशा दररोज सरस्वती क्रीडा संकुल, ठाणे येथे सकाळ आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात महेंद्र बाभूळकर आणि प्रणाली मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचा कसून सराव करते. भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेत या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे ध्येय क्रिशाने आपल्या समोर ठेवले आहे.