ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने उद्यापासून संगीत भूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव सुरू होत आहे. सायंकाळी ७ वाजता महोत्सवाची सुरूवात होणार असून रसिकांना शास्त्रीय गायनाबरोबरच कथ्थक नृत्य, संगीत नाटकाची मेजवानी मिळणार आहे.
राम गणेश गडकरी रंगायतन येथे २ ते ४डिसेंबरपर्यत हा महोत्सव सुरू राहणार असून विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
२ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता ‘इंडीरुट्स’ या शास्त्रीय गायन वादनाने कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. सायली तळवलकर आणि सहकलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. गेली ४५ वर्षे कथ्थ्क या नृत्यप्रकाराची अतुलनीय साधना करुन आजवर कथ्थक नृत्याच्या अनेक शिष्या घडविणाऱ्या डॉ. मंजिरी देव यांना संगीतभूषण पं. राम मराठे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रोख रुपये ५१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. गेली २० वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्या व १० वर्षे अध्यापनाचे काम करीत संगीताची साधना करणाऱ्या दीपिका भिडे- भागवत यांना पं. राम मराठे युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख रुपये २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रात्री ८.३० वाजता होणार आहे. तद्नंतर रात्री ९.३० वाजता बेगम परवीन सुलताना यांचे गायन होणार असून त्यांना शादाब सुलतान खान हे सहकलाकार म्हणून साथसंगत करणार आहेत.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार ३ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता श्री. विधालाल, दिल्ली यांचे कथ्थक नृत्य सादरीकरण आहे. सायंकाळी ६ वाजता शोभा चौधरी, अपर्णा केळकर, अविराज तायडे हे ठुमरी/ दादरा/ ठप्पा सादरीकरण करणार आहेत. तर रात्री ८.३० वा. पं. तेजेंद्र मुजुमदार, कोलकत्ता (सरोद) सादरीकरण करणार आहेत.
रविवार ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता निधी प्रभू (कथ्थक नृत्य), कल्याणी साळुंखे (गायन), मुकूंद मराठे यांच्या गायनाची बहारदार मैफिल रंगणार आहे. दुपारी ४ वाजता वर्षा जोगळेकर आणि सहकलाकार ‘सौभद्र’ संगीत नाटक सादर करणार आहेत. तर महोत्सवाची सांगता रात्री ८.३० वाजता होणार आहे. यावेळी पं. शिवकुमार शर्मा यांना श्रध्दांजलीपर कार्यक्रमात पं. सतीश व्यास (संतूर वादन), पं. मुकूंदराज देव (तबला), विवेक सोनार (बासरी), अंबी सुभ्रमन्यम् (व्हायोलिन), राजेश श्रीनिवासन (मृदुंगम) यांची आगळी वेगळी मैफिल रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.