तीन दिवसांत १६ रुग्णांनी घेतला लाभ
ठाणे : मुंब्रा येथील कौसा रुग्णालयात ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वस्त दरात डायलेसीसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या तीन दिवसांत या सुविधेचा लाभ वार्षिक उत्पन्न एक लाखाहून कमी असलेल्या १६ रुग्णांनी मोफत घेतला आहे.
कोपरी, लोकमान्य, ठाणे, कळवा आणि मुंब्रा या पाच ठिकाणी स्वस्त दरात डायलेसिसची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने काही वर्षांपुर्वी घेतला होता. त्यानुसार पाच ठिकाणी ही केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. ही केंद्रे खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्यात आली असली तरी सेवेचे दर मात्र महापालिकेने निश्चित केले आहेत.
मुंब्रा शहरातील रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्येही डायलेसीससाठी जावे लागत होते. परंतु येथील खर्च रुग्णांना परवडत नव्हता. यामुळे काही रुग्ण डायलेसीसच्या सुविधेसाठी ठाणे शहरात पालिकेच्या केंद्रांवर येत होते. मात्र, यासाठी त्यांना मुंब्रा ते ठाणे असा प्रवास करावा लागत होता. त्यात त्यांचे हाल होत होते. मुंब्रा येथील कौसा रुग्णालयात डायलेसीसची सुविधा सुरु झाल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. तीन दिवसांपूर्वी पालिकेने हे केंद्र सुरु केले असून याठिकाणी डायलेसिस सुविधेसाठी आवश्यक असणारी १० यंत्रे ठेवण्यात आली आहेत. याठिकाणी गेल्या तीन दिवसांत १६ रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. या सर्व रुग्णांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असल्याने त्यांना ही सेवा मोफत देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी यांनी दिली.
असे आकारले जाणार शुल्क
ठाणे महापालिकेने डायलेसिसच्या सुविधेसाठी तीन प्रकारची वर्गवारी करून दर ठरवून दिले आहेत. त्यात ठाणे महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांपैकी ज्यांचे उत्पन्न वर्षांला एक लाखापेक्षा कमी आहे, अशांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येते. ज्या नागरिकांचे उत्पन्न क्रीमिलेअर मर्यादेपेक्षा कमी असेल अशा रुग्णांना प्रति डायलेसिस ५०० रुपये इतके शुल्क आकारण्यात येते. तर या मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना १००० रुपयांचा दर आकारण्यात येतो.