ठाणे : एकनाथ शिंदे समर्थक ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ आता ठाण्यातून अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक पुढे येत आहेत. त्यांच्या माध्यमातून शिंदे यांना जाहीर समर्थनही करण्यात आले आहे. शिवसेनेने शिंदे समर्थकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नरेश म्हस्के यांच्या जागेवर अद्याप शिवसेनेकडून दुसरी नियुक्ती करण्यात आलेली नाही. या यादीत केदार दिघे आणि सुभाष भोईर यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु त्या बाबतचा निर्णय अद्यापही शिवसेनेने जाहीर केलेला नाही.
दुसरीकडे शिवसेनेतील महिला गटातील आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेल्या माजी महापौर तथा जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिंदे यांच्या समर्थकांमध्ये त्या सामील झाल्याने त्यांच्यावर देखील ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे समर्थकांना हा आणखी एक धक्का मानला जात आहे. मीनाक्षी शिंदे या शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जात होत्या.