ठाणे – मागील दोन वर्षात पहिल्यांदाच नवीन कोरोना रुग्णांचा आकडा दहाच्या खाली आला आहे. शहरात आज अवघे नऊ रूग्ण सापडले आहेत. १७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सहा प्रभाग समिती क्षेत्रात एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही तर शंभरच्या खाली सक्रिय रूग्ण राहिले आहेत.
महापालिका हद्दीतील माजीवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सर्वाधिक पाच नविन रूग्ण सापडले आहेत. उथळसर येथे तीन तर नौपाडा कोपरी प्रभाग समिती परिसरात एक रूग्ण नोंदवला गेला आहे. वर्तकनगर, वागळे, कळवा, दिवा, मुंब्रा आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती भागात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी १७ जण रोग मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१ हजार ३३३ रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. तर रुग्णालयात आठ आणि घरी ९१ जणांवर असे ९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आत्तापर्यंत दोन हजार १२७ जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ५३४ नागरिकांची चाचणी केली होती. त्यामध्ये अवघे नऊ जण पॉझिटिव्ह मिळाले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ८८ हजार १३२ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ८३ हजार ५५९ जण बाधित सापडले आहेत.