दोन लाखाचा मुद्देमाल केला जप्त
अल्पवयीन मुलाचा समावेश
कल्याण : डोंबिवली मानपाडा पोलिसांनी पाच सराईत दरोडेखोरांना दोन तासात बेड्या ठोकल्या आहेत. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
चंद्रकांत उर्फ मोठा चंद्या रमेश जमादार, शिवा रुषीपाल तुसंबल, सत्यप्रकाश मुकेशकुमार कनोजिया असे या दरोडेखोरांचे नाव आहे तर एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. हे आरोपी दरोड्यासाठी रिक्षेचा वापर करत रस्त्यावर चालणाऱ्या कारला आधी कट मारत असत. नंतर कार थांबवून त्यामध्ये असलेल्या कार चालक आणि प्रवाशांना मारहाण करत दरोडा टाकून फरार होत. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे गोवंडीत राहणाऱ्या एका ओला कारला कट मारत कार थांबवून त्या ओला चालक आणि त्यात बसलेल्या तीन प्रवाशांना शिवीगाळ करत मारहाण करून त्यांची पर्स, मोबाईल आणि त्यांच्याजवळील मौल्यवान वस्तू जबरीने घेऊन फरार झाले होते.
याप्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होताच झोन तीनचे अपर पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करून तांत्रिक तपास व गुप्तबातमीदाराच्या मदतीने या पाच आरोपींना दोन तासात बेड्या ठोकल्या. या आरोपींकडून नऊ मोबाईल फोन, एक लॅपटॉप, रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली रिक्षा असा एकुण दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार या दरोडेखोरांवर कल्याण, डोंबिवली आणि इतर परिसरात खुन, दरोडा, दरोडयाची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दुखापत, सरकारी नोकरास दुखापत, अवैध शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून यात मुख्य आरोपी चंद्रकांत जमादार हा तडीपार आहे.