मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ठाण्यात लढायला तयार

आदित्य ठाकरे यांचे आव्हान

ठाणे : ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. याच ठाण्यात मी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढायला तयार असल्याचे सांगत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले. तुम्ही मला निवडून द्या मी राज्याला छळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे हिला झालेल्या मारहाणीनंतर बुधवारी ठाण्यात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर शक्तीस्थळावर झालेल्या सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महिलेवर अत्याचार होत असतांना मुख्यमंत्री एक शब्दही बोलत नसल्याबाबत आश्चर्य वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चा काढतानाही काही अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे मी इथे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी नाही तर कौतुक करण्यासाठी आल्याचे सांगत टीकेची झोड उठवली.
राज्यात एवढे प्रश्न असतांना शेतकरी आत्महत्या होत असताना, येथील उद्योग गुजरातला जात असतांना, महिलांवरील अत्याचार वाढले असतांना राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठे? ते महाराष्ट्र राज्याचे नाही तर गुजरात आणि गुवाहाटीचे मुख्यमंत्री असल्याची टीकाही त्यांनी केली. त्यातही महाराष्ट्राला मुख्यमंत्री लाभला नसून गुजरातला दोन मुख्यमंत्री लाभल्याने त्यांचे अभिनंदन करतो अशी टीका त्यांनी केली.

तुम्हाला काय करायचे ते करा, किती गुन्हे दाखल करायचे ते करा मात्र पुन्हा आमचे सरकार येणार आहे, हे विसरु नका आणि जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा तुम्हा सर्वांना जेलभरो यात्रा घडवली नाही तर बघा असा इशारा देखील दिला.

पोलिसांची एकाच समूहावर अन्याय करण्याची प्रवृत्ती-जितेंद्र आव्हाड

मोर्चा किती भव्य आहे ते महत्त्वाचं नाही तर मोर्चा कशासाठी निघतोय ते महत्त्वाचं आहे. जो कायदा पोलिसांनी पाळला पाहिजे तो कायदा पायदळी तुडवला जातो आहे. आयपीएस होताना पोलीस शपथ घेतात की निःपक्षपातीपणाने कारभार करेन. ते कधीही दिसतच नाही. एका समूहावर कायम अन्याय करण्याची प्रवृत्ती दिसते आहे. त्यामुळेच आम्ही हा मोर्चा काढला आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

मोर्च्यासाठी मुंबई-रायगडहून माणसे आणावी लागली- म्हस्के

शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मोर्चावर कडाडून टीका केली. ज्या जितेंद्र आव्हाडांनी उद्धव ठाकरेंचा फोटो खड्ड्यात बुडवला होता. ज्या जितेंद्र आव्हाडांनी बाळासाहेब ठाकरेंवर चुकीच्या शब्दांमध्ये टिपण्णी केली होती. अशा आव्हाडांना सोबत घेऊन मोर्चा काढला जातो आहे. उद्धव ठाकरेंकडे ठाण्यात आणायला माणसं नाहीत, त्यामुळेच मुंबई, रायगड या ठिकाणांहून माणसं आणावी लागली असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला.