ठाणे : पावसाळा तोंडावर असून पावसाळ्यातील संभाव्य आपत्कालीन परिस्थितीशी तोंड देण्यास जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील २०६ गावे ही दरडी आणि पुराच्या छायेखाली असून पूरस्थिती निर्माण झाल्यास या २०६ गावांमधील तब्बल दोन लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या प्रभावित होण्याची शक्यता असल्याची भीतीही प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात १५७ गावे पूररेषेखालील असून यात एक लाख १६,७१५ लोकसंख्या ही बाधित होण्याची शक्यता आहे. तर ४९ गावे दरडग्रस्त असून यामध्ये ८७,९१२ लोकसंख्या ही बाधित होण्याची चिन्हे आहेत.
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक पूररेषेखालील गावे ही उल्हासनगर, शहापूर आणि भिवंडीमध्ये आहेत. भिवंडीमध्ये ५५ गावे, शहापूरमध्ये २५ तर उल्हासनगरमध्ये २३ गावांचा यात समावेश आहे. या सर्व गावांना त्या-त्या महापालिकांच्या वतीने नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
ठामपा हद्दीत सर्वाधिक दरडग्रस्त गावे
ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक १४ गावे दरडग्रस्त असून शहापूरमध्ये १० तर भिवंडीमध्ये आठ गावे ही दरडग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. ठाणे पालिका क्षेत्रातील मुंब्रा आणि कळवा तसेच लोकमान्य नगरच्या डोंगरपट्ट्यातील झोपड्यांना तत्काळ घरे खाली करण्याच्या नोटिसा पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मुंब्र्यात जवळपास १९ पेक्षा अधिक परिसर आहेत ज्या परिसरात हजारोंच्या संख्येत हे रहिवासी वास्तव्यास आहेत.
दरडग्रस्त गावांची संख्या – ४९
बाधित होणारी लोकसंख्या – ८७,९१२
पुरग्रस्त गावांची संख्या -१५७
बाधित होणारी लोकसंख्या – १,१६,७१५