आज शिंदे गटातील दहा अपक्ष आमदारही राज्यपालांना भेटण्याची शक्यता
मुंबई : राज्यातील सत्ता नाट्यात अखेर आज मंगळवारी भाजपने प्रवेश केला आहे. दिल्लीवारीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांसह रात्री राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांची भेट घेतली. बहुमत चाचणीचे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले असून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान उद्या शिंदे गटातील दहा अपक्ष आमदार राज्यपालांना भेटून महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याचे पत्र देणार असल्याचे कळते.
एकीकडे मविआ सरकार संकटात आलेले असताना मंत्रिमंडळ बैठकांमध्ये लोकहिताचे निर्णय घेण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. मविआ सरकार निवडणुकीची तयारी करत आहे. असे असताना तिकडे शिंदे गट मविआ सरकारला सुरुंग लावण्याची तयारी करत आहे. अशातच शिंदे गटाचे काही आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मिळत आहे. आषाढी अमावास्येमुळे शिंदे गटाने राज्यपालांना भेटण्याचे पुढे ढकलल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला चर्चेला मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तर शिंदे यांनी एका दिवसाची मुदत देत, ठाकरेंनी निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. यामुळे अमावास्या संपली की उद्या बच्चू कडू १० बंडखोर आमदारांना घेऊन मुंबईत येणार असून राज्यपालांना भेटतील असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. मराठी वृत्त वाहिन्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
कडू हे राज्यपालांना ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचे पत्र देतील. या पत्रावर शिवसेनेच्या गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांची सही असणार आहे. पत्र तयार आहे, रात्रीपर्यंत सर्व आमदारांच्या सह्या घेतल्या जातील. या आमदारांमध्ये शिवसेना नाही तर अपक्ष आमदार अधिक असण्याची शक्यता आहे. तसे सूतोवाच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले आहे. शिवसेना आमदारांपेक्षा अपक्ष आमदारच पुढे होऊन राज्यपालांना ठाकरे सरकारविरोधात पत्र देतील, असे ते म्हणाले होते. या आमदारांच्या संरक्षणासाठी तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना तैनात केले जाईल.
भाजप नेते ऍक्शन मोडमध्ये
जे.पी. नड्डा आणि अमित शहा यांना भेटल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीहून महाराष्ट्रात परतले. मंगळवारी भाजप नेत्यांची बैठक झाल्यानंतर फडणवीस हे रात्री ९ नंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना भेटले. त्यांच्यात अर्ध्या तासाहून जास्त वेळ चर्चा झाली. यावेळी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी चाचणी करण्याचे पत्र त्यांनी राज्यपालांना दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.