ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस ९ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील वागळे इस्टेट मधील चेकनाका येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशाच प्रकारचा उल्लेख असलेला एक बॅनर विधानसभेच्या निवडणुकीनंतर देखील लागला होता. आता पुन्हा वाढदिवसाच्या निमित्ताने अशा प्रकारचे बॅनर लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात पक्षासाठी अहोरात्र मेहेनत घेतली असून आशा व्यक्तीला भावी मुख्यमंत्री बनवावे अशी भावना शिवसैनिकांनी वर्तवली आहे. उद्धव ठाकरे चांगले काम करतात त्यांच्यावर आम्ही नाराज नसून मात्र एक शिवसैनिक म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री रूपात पाहण्याची आमची इच्छा असल्याची भावना ठाण्यातील शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानेवर शस्त्रक्रिया झाली होती. जवळपास दोन महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांनी घरूनच राज्याचा कारभार चालवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते फारसे बाहेर पडत नाहीत, त्यामुळे सतत भाजपकडून त्यांच्यावर टीका होत आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही याच मुद्यावरून एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्रीपदाचा प्रभार सोपवण्याची मागणी केली होती.