ठाणे जिल्हाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची पोस्ट आणि पोस्टरबाजी
ठाणे 555: एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ३७ आणि अपक्ष नऊ आमदारांनी बंद केल्याने शिवसेनेत भूकंप झाला आहे. एकीकडे शिंदे गट सत्ता स्थापनेसाठी भाजपशी जवळीक साधून आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन केले आहे. त्यामुळे ठाण्यातील शिवसैनिक संभ्रमात होते, मात्र शिंदे यांचा मोठा प्रभाव जिल्ह्यावर असल्याने ठाणे शहरातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांचाच झेंडा हाती घेण्याचे ठरवले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यात शिंदे यांच्या बाजूने आमदारांची फौज वाढत असल्याने आता ठाण्यातील शिवसैनिकांनी देखील शिंदे यांनाच साथ देण्याचा निर्धार केला आहे. मागील दोन दिवस ठाण्यातील शिवसैनिक देखील एक एक करुन एकमेकांचा कानोसा घेत होते, काहींच्या मनात शिंदे कि ठाकरे अशी व्दिधा मनःस्थिती निर्माण झाली होती. परंतु अशांची मने वळविण्याचे काम शिंदे समर्थकांकडून आता यशस्वीपणे केले गेल्याचेच चित्र गुरुवारी ठाण्यात दिसत होते. काहींनी या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील भेट घेतली आणि शिंदे यांनाच पाठींबा असल्याचे जाहीरपणे सांगितले. काही शिंदे समर्थकांनी अनेकांनी फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून मन वळविण्याचे काम केल्याचेही बोलले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील आता प्रत्येक भागात शिंदे समर्थकांनी बॅनरबाजी सुरु केली आहे.
साहेब, आम्ही तुमच्या सोबतच.. आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळांना अशा आशायाचे फलक शहरभर लावले जात आहेत. त्या फलकांवर शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे फोटो दिसत आहेत. मात्र कुठेही उध्दव ठाकरे यांचा फोटो दिसून आला नाही.
महाविकास आघाडीबरोबरच शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुरुवारी ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी उघडपणे शिंदे यांना समर्थन जाहीर केले. या पोस्टमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो नाही. त्यांच्याबरोबरच काही माजी नगरसेवकांनीही शिंदे यांना समर्थन देत तसे फलक लावले आहेत. यामुळे जिल्ह्यात शिंदे समर्थकांच्या शक्तीप्रदर्शनाला सुरवात झाल्याचे चित्र दिसत आहे.
गुरुवारी शिंदे यांच्या समथनार्थ त्यांच्या निवास्थानाबाहेर समर्थक शक्तीप्रदर्शन करणार होते. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. काही शिवसैनिकांपर्यंत याची माहिती न पोहचल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे.