आदिवासींचे पाणी जाते कुठे?
ठाणे : संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या येऊर परिसरात अनाधिकृत बांधकामे आणि बंगले उभारून अनधिकृतपणे नळजोडण्या घेऊन आदिवासींचे पाणी पळवणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कारवाई केली आहे.
गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये अनधिकृतपणे पाणी चोरणाऱ्या आठ नळ जोडण्यांवर कारवाई करून पालिकेने या सर्व जोडण्या खंडित केल्या आहेत. यापुढे देखील अशाप्रकारची कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाण्यातील निसर्गसंपन्न परिसर अशी ओळख असलेल्या येऊर गावामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि बांधकाम व्यवसायिकांकडून भव्य बंगल्यांची उभारणी केली जात आहे. २००९ मध्ये जेमतेम १३४ बंगले असलेल्या या भागात २०२० पर्यंत ५०० हून अधिक बांधकामे उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात नव्या बांधकामांची गती अधिक वेगाने वाढून स्पोर्ट्स क्लब, टर्फ क्लब, रेस्टॉरन्ट, रिसॉर्ट आणि हॉटेल्सची संख्या कमालीची वाढली आहे.मात्र याकडे महापालिका, वन विभाग आणि महसूल यांच्याकडून सर्रासपणे डोळेझाक झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
येऊरमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी पाडे असून यामध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. आदिवासी बांधवांना पाणी मिळावे यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने नळ जोडण्या तसेच पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र हे पाणी आदिवासी बांधावांना न मिळता थेट अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या बंगले आणि हॉटेल्सला जात आहे. यासंदर्भात उशीरा का होईना ठाणे महापालिकेला जाग आली असून अनधिकृतपणे कनेक्शन घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
आठवडाभरात ६० नळजोडण्या तोडल्या
ठाणे महापालिकेच्या वतीने आठवडाभरापूर्वी या कारवाईला सुरुवात केली आहे. यामध्ये आतापर्यंत विविध हॉटेल्स, बंगले आणि बांधकामांचे असे मिळून आतापर्यंत ६० जोडण्या पालिकेच्या वतीने खंडित करण्यात आले आहे. यापुढेही अनधिकृतपणे नळ जोडण्या घेणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.