कोरोनामुळे आर्थिक संकट; दोन महिन्यांच्या मुलीची विक्री

अंबरनाथ : कोरोनाच्या आर्थिक संकटात तिसऱ्या अपत्याचा.बोजा कुटुंबावर पडणार या भितीने एका   दाम्पत्याने त्यांच्या दोन महिन्याच्या मुलीचा सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. शहरातील एका रिक्षाचालकाने दोन महिन्याच्या मुलीला नालासोपारा येथील एका दाम्पत्याला बेकायदा पद्धतीने दिले आहे. याप्रकरणी जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

दोन महिन्यांपूर्वी तिसरी मुलगी झाल्याने या मुलीचा शिक्षणाचा आणि लग्नापर्यंतचा खर्च कसा करायचा या विवंचनेत असलेल्या अंबरनाथमधील एका कुटुंबाचा संपर्क नालासोपारा येथील एका दाम्पत्याशी झाला. मुलीच्या आई- वडलांनी १००  रुपयांच्या मुद्रांक कागदावर दत्तक विधान करून दोन महिन्यांची मुलगी त्यांच्याकडे सोपवली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला अंबरनाथ येथील शहरी बाल संरक्षण समितीच्या सदस्यांकडून अशा प्रकारे बाळाची विक्री झाल्याची माहिती मिळाली.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या आदेशानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या पल्लवी जाधव आणि वन स्टॉप सेंटरच्या सिद्धी तेलंगे यांनी त्वरित अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांच्या मदतीने  संबंधित दाम्पत्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची दोन महिन्यांची मुलगी नालासोपारा येथील दांपत्याला दिल्याचे त्यांनी कबूल केले. कोरोनाच्या काळात टाळेबंदीमुळे आर्थिक बेताची स्थिती निर्माण झाली आहे. मुलीचा सांभाळ, तिचे शिक्षण आणि लग्न करू शकणार नाही म्हणून ही मुलगी देण्याचे ठरवल्याचे या दोघांनी सांगितल्याची माहिती बाल संरक्षण कक्षाच्या पल्लवी जाधव यांनी दिली आहे. या प्रकारानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाला बालकल्याण समितीच्या आदेशानंतर जननी आशिष या विशेष दत्तक संस्थेत दाखल करण्यात आले आहे. पोलीस आरोपींची चौकशी करत असून त्यातून यात आर्थिक व्यवहार झाला आहे का याचीही पडताळणी केली जाते आहे.

बाळ दत्तक देणे- घेणे यासाठी  केंद्रीय दत्तक संसाधन (सीएआरए ) कायदेशीर प्रक्रिया आहे. या  प्राधिकरणाच्या माध्यमातून देशभरात केंद्रीकृत पद्धतीने ही प्रक्रिया केली जाते. तर नात्यातील दत्तक प्रक्रिया न्यायालयाच्या संमतीने केली जाते. या कायदेशीर प्रक्रिया न करता केलेले व्यवहार गुन्ह्यात ग्राह्य धरले।जातात. त्यामुळे या प्रक्रियांचा अवलंब न करण्याचे आवाहन आणि यातील समस्यांबाबत कार्यालयाशी संपर्क साधण्याचे  आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केले.