अवकाळी पावसामुळे हंगामा आधीच रानभाज्या बाजारात 

मुरबाड : पावसाळ्याच्या सुरुवातीला साधारण जून महिन्यात पिकणाऱ्या औषधी गुणधर्म असणाऱ्या रानभाज्या वळवाच्या सततच्या पावसाने यंदा मे महिन्यातच बाजारात दाखल झाल्या आहेत.

लागवड न करता कुठल्याही खताशिवाय निसर्गतःच पिकणाऱ्या या आरोग्यासाठी अत्यंत पोषक, गुणकारी व स्वस्त रानभाज्यांच्या विक्रीतून आदिवासी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र या वर्षी मे महिन्यात वळवाच्या पावसाने धुडगूस घातल्याने आदिवासींच्या उत्पनाचे साधन एक महिना आधीच उपलब्ध झाले आहे.

रानमाळावर कुठलेही बी-बियाणे, खते न टाकता जंगलात औषधी रानभाज्या उगवतात. या भाज्यांना ग्राहाकंकडून वाढती मागणी असल्याने या भाज्यांच्या विक्रीवर आदिवासी बांधव आपला उदरनिर्वाह चालवतात. या भाज्या अनेक विकारांवर देखील उपयोगी असल्याने बाजारात विक्रीसाठी आल्यावर तालुक्यातील आठवडी बाजार सरळगांव, म्हसा, धसई, टोकावडे, मुरबाड, किन्हवली या छोट्या बाजारात भाज्या खरेदीसाठी महिलांची एकच झुंबड दिसून येत आहे. तसेच या गुणकारी भाज्या कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई यासारख्या शहरात सुद्धा विक्रीसाठी जात असल्याने आदिवासी बांधवांना पावसाळ्यात देखील उपजिविकेच साधन उपलब्ध होते. आदिवासी बांधवांसाठी हे सुगीचे दिवस ठरत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.

तालुक्यात ६ मे पासून पावसाने दमदार हजेरी लावली असून त्यात खंड पडला नाही. माळशेज घाट, आजोबा पर्वत आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये येथील माळरानावर सध्या निसर्गनिर्मित माठ, तेळपट, तोरणा, आनंदवेल, रानटोण, करडई, सफेद मुसळी, खुरासणी, बाफळी, टाकळा, मायाळू, दिंडा, लोत, नारणवेल, मोजड्या, शेवळी सारख्या औषधी रानभाज्या तसेच जांभळे, करवंदे, आवळे, चायवळ यासारखी फळे दिसून येत आहेत. आदिवासी महिला त्या वनस्पती खुडून विक्रीसाठी तालुक्यातील बाजारात आणत आहेत. याच रानभाज्यांच्या आधारावर आदिवासी कुटुंबे पावसाळ्यात आपल्या संसाराचा गाडा चालवतात.

बाजारातील इतर भाज्यांपेक्षा या भाज्या स्वस्त मिळत असल्याने गृहिणींची झुंबड उडते. या भाज्यांमध्ये शेवळी ही भाजी वात विकारावर उपयुक्त असून ही भाजी उकडुन सूकवून ठेवून वर्षभर खाण्यासाठी वापरतात. बाफळी या भाजीचा उपयोग बद्धकोष्ठता आणि पोटदुखीवर गुणकारी औषध म्हणून केला जातो. कंटोळ ही  भाजी संधीवात व पित्ताच्या विकारावर उपयोगी पडते. या भाज्यांना बाजारात जास्त मान असून या चविष्ट गुणकारी भाज्या घेण्यासाठी कल्याण, डोंबिवली, ठाणे येथील भाजीपाला व्यापारी या भाज्या खरेदीसाठी मुरबाड तालुक्यात जातात.

निसर्ग देखील मानवजातीची काळजी घेत असल्याने असाध्य रोगावर देखील पावसाळ्यात आरोग्यवर्धक भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जातात. फक्त आपल्याला त्याचा लाभ घेता आला पाहिजे (माजी आ.पांडूरंग बरोरा)

पावसाळ्यातील या नैसर्गिक गुणकारी भाज्यांमुळे आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो व काही पैसे वाचतात ते मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी येतात. (नवसू पारधी, भाजी विक्रेता)