डोंगरीपाडावासींना मिळाले कार्यक्रमांसाठी हक्काचे सभागृह

ठाणे : वर्षानुवर्षे घराबाहेर छोटा मंडप वा दूरवरील सभागृह भाड्याने घेऊन घरगुती, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करणाऱ्या डोंगरीपाडावासींना आता हक्काचे सभागृह उपलब्ध झाले आहे.

भाजपा नगरसेविका अर्चना किरण मणेरा यांच्या प्रयत्नाने गणपती मंदिराबाहेर पडवी व मंदिरालगत सभागृहाचे काम पूर्ण करण्यात आले. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. डोंगरीपाडा परिसर हा चाळी व छोट्या घरांचा आहे. या परिसरात एकही सभागृह नाही. त्यामुळे डोंगरीपाडा, पातलीपाडा, समतानगर, इंदिरापाडा परिसरातील नागरिकांना घरगुती कार्यक्रम, बारसे, मुलांचे वाढदिवस, विवाह समारंभ, उत्तरकार्य आदींसाठी घराबाहेर छोटा मंडप टाकावा लागत असे. तर भजन, प्रवचन, सत्संग वा किर्तनासाठी जागा नसल्यामुळे कार्यक्रमांना मर्यादा येत होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नगरसेविका अर्चना किरण मणेरा यांनी डोंगरीपाडा भागात कायमस्वरुपी सभागृहासाठी प्रयत्न सुरू केले होते.

डोंगरीपाडा येथे गणपती मंदिर आहे. या गणपती मंदिरालगत मोकळी जागा होती. मात्र, त्यावर सर्रासपणे पडीक सामान टाकले जात होते. या ठिकाणी सभागृह उभारता येईल, हे लक्षात घेऊन नगरसेविका अर्चना मणेरा यांनी मंदिराबाहेर शेड आणि मंदिरालगत सभागृह उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला. समाजसेवक डॉ. किरण मणेरा यांनी नागरिकांना मंदिराबाहेर शेड व सभागृहाची उपयुक्तता पटवून दिली. त्यानंतर महापालिकेकडून सभागृह उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर गणपती मंदिराबाहेर शेडलाही मंजूरी घेण्यात आली. या शेडमुळे आता भजन, प्रवचन, सत्संगसारखे कार्यक्रम घेण्यास मदत होणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार संजय केळकर, आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या हस्ते गणपती मंदिराची शेड व सभागृहाचे काल सायंकाळी लोकार्पण करण्यात आले. या वेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संदिप लेले, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, मुकेश मोकाशी, महिला मोर्चाच्या अध्यक्षा व नगरसेविका मृणाल पेंडसे, कविता पाटील, कमल चौधरी, ठाणे जिल्हा बॅंकेचे संचालक प्रशांत पाटील, परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील, भाजयुमोचे शहराध्यक्ष सारंग मेढेकर, हेमंत म्हात्रे, राम ठाकूर आदींची उपस्थिती होती.