डोंबिवली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त डोंबिवलीच्या मनस्वी मस्करे हिने एलिफंटा बेट ते गेटवे ऑफ इंडिया हा १२ किलोमीटरचा जलतरण प्रवास प्रतिकूल वातावरणात पूर्ण केला.
१७ फेब्रुवारी रोजी पहाटे ४:३० वाजता, अंगाला ग्रीस लावून, तिने एलिफंटा बेटावरून समुद्रात उडी घेतली. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांच्या नेतृत्वाखाली तिचा हा प्रवास सुरू झाला. थंड वारे, समुद्रातील वाढते प्रदूषण, प्रचंड लाटा, मोठमोठ्या बोटी आणि जहाजांची ये-जा या सगळ्या अडथळ्यांमधून मनस्वीने आपल्या जिद्दीच्या बळावर मार्ग काढला. जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष करत ती प्रेरित होत राहिली. अथक प्रयत्नांनंतर मनस्वीने गेटवे ऑफ इंडिया गाठले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मानाचा मुजरा केला. उपस्थित नागरिक, स्विमिंग कोच आणि मार्गदर्शकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले. तिच्या या अद्वितीय पराक्रमाने सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे. जिमखाना येथे प्रशिक्षक विलास माने आणि रवी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सराव केला.
ओमकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकणारी मनस्वी जलतरण, कराटे आणि फुटबॉलमध्ये अतिशय उत्साही आहे. राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा तसेच डी. एस. ओ. शालेय क्रीडा जलतरण स्पर्धेत तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.