विकासक पाणी देण्यास असमर्थ; यापुढे नवीन इमारतींना ओसी नको

आमदार जितेंद्र आव्हाडांची जनता दरबारातून महापालिकेकडे मागणी

ठाणे: गेल्या ४५ वर्षांत ठाणे महापालिकेला स्वतःचे धरण बांधता आले नाही. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर विकासक रहिवाशांना पाणी देण्याबाबत सक्षम नसेल तर यापुढे नवीन इमारतींना ओसी देऊ नका, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे.

सोमवारी ठाणे महापालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे सभागृहात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर इथल्या सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.

ठाणे महापालिकेला गेल्या ४५ वर्षात ठाणेकरांसाठी धरण बांधता आले नाही. मी स्वतः शाई धरण आणले होते. ते का करू शकले नाहीत? दोन हजार कोटींचे रस्ते बांधले जातात मग धरण का बांधता येत नाही, असा प्रश्न आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला. गल्लोगल्ली कचरा आहे, पाणी नाही, अख्या शहरातील नालेसफाई ठप्प आहे, प्रत्येक तलावात सांडपाणी सोडले जाते मग मलनिस्सारणचा निधी गेला कुठे असा सवाल उपस्थित करीत गेल्या ४५ वर्षात वॉटर आणि गटारची सुविधा करता आली नसल्याची टीका देखील आमदार आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

ओसी देताना रहिवाशांना पुरेसा पाणी पुरवठा करण्याची अट विकासाला घातली जाते, मग विकासक पाणी देण्यास सक्षम नसेल तर त्याला ओसी का दिली जाते? यापुढे सर्व नवीन बांधकामांना ओसी देणे बंद करा, अशी मागणी देखील आव्हाड यांनी पालिका आयुक्तांकडे जनता दरबाराच्या माध्यमातून केली.

शहराला स्वतःचे डम्पिंग ग्राउंड नाही, धरण नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, क्लस्टर योजना पुढे सरकलेली नाही, त्यामुळे विकासाची दूरदृष्टी नसलेली माणसे नेतृत्व करतात, त्या शहराची काय अवस्था होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘ठाणे’ अशी जोरदार टीका श्री.आव्हाड यांनी ठाण्यातील सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

मानपाडा परिसरात ८० लोकांचा क्लस्टरला विरोध असताना या नागरिकांवर जबरदस्तीने क्लस्टर योजना लादली जात आहे. ज्यांची घरे मोठी आहेत ते क्लस्टर योजनेत का जातील? आतापर्यंत क्लस्टरच्या किती योजना यशस्वी झाल्या? असे प्रश्न यावेळी आव्हाड यांनी उपस्थित केले. सात सात एकर जागा विकासकाला द्यायची आणि विकास करायला सांगायचा तो विकासक काय विकास करणार. ठाण्यात सर्व एसआरए योजना बंद आहेत. एसआरए योजनेचा समावेश जबरदस्तीने क्लस्टरमध्ये करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.