मुंबई : दक्षिण भारतावर मंदोस चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे. तामिळनाडू, पद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तिन्ही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून महाराष्ट्रातही पावसाची शक्यता व्यक्त होत आहे.
शुक्रवारी मध्यरात्री आणि शनिवारी सकाळपर्यंत मंदोस चक्रीवादळ पश्चिम-उत्तर-पश्चिमकडे सरकणार आहे. त्यानंतर उत्तर तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशमध्ये चक्रीवादळ पोहचेल. या दरम्यान वाऱ्याचा वेग 65 किमी प्रतितास ते 85 किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मंदोस चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्र आणि गुजरातलाही बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 11 ते 13 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मुंबई ,पुणे ,ठाणे, रायगड आणि गोव्याच्या किनाऱ्याजवळ वादळ पुन्हा आले आहे. त्याचा प्रभाव पडल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 3, 4 दिवस, काही ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहील आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.