कल्याण: रंजीत दुबे आणि रामसागर या चुलत भावांच्या कुटुंबात गावच्या जमिनीवरुन वाद होता. याच वादातून राम सागर याने रंजितची निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. जखमी रंजीत एका इमारतीत शिरून दरवाजे ठोठावत होता, पण एकानेही दरवाजा उघडला नाही. अखेर राम सागर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी इमारतीत शिरून त्याची निर्घृण हत्या केली.
या घटनेनंतर कोळसेवाडी पोलिसांनी राम सागर याच्यावर गुन्हा दाखल केला होता. अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी राम सागर याला बेड्याही ठोकल्या.
रंजित दुबेला त्याचाच सख्ख्या चुलत भाऊ राम सागर दुबेने भर रस्त्यात गोळ्या घातल्या. दोन गोळ्या राम सागर दुबेने रंजीतवर झाडल्या, त्यातली एक गोळी लागल्यानंतर भेदरलेला रंजित आपला स्वतःला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होता. रस्त्याने पळत होता, बाजूला असलेल्या इमारतीमध्ये रंजित आपला जीव वाचवण्यासाठी गेला, त्याच्या शरीरावरून रक्ताच्या धारा लागल्या होत्या, त्या इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत तो पोहोचला. त्या इमारतीमधील घरांचा दरवाजा, बेल वाजवून त्याने मदतीची हाक मारत होता. मात्र, रंजीतला मदतीसाठी कोणीही दरवाजा उघडला नाही. मारेकरी राम सागर आणि त्याचे साथीदार त्याचा पाठलाग करत इमारतीमध्ये शिरले आणि चौथ्या मजल्यावर डोक्यात वार करत त्याचा जीव घेतला. ज्या इमारतीमध्ये रंजित दुबे जीव वाचवण्यासाठी धावला त्या ठिकाणी त्याचे रक्त पडल्याचे दिसून येत होते. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. तर लोक अशा कठीण प्रसंगात मदतीसाठी पुढे येत नसल्याने संताप देखील व्यक्त केला जात आहे.
मृत रंजितच्या वडिलांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, रंजितच्या वडिलांनी अनेकवेळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. अर्ज केले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच दाखल घेतली नसल्याने आपल्या मुलाची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या घटनेबाबत रंजीत दुबेच्या बहिणीने माहिती देताना सांगितलं की, राम सागरने माझ्या मोठ्या भावाला मारले. त्याने पहिले माझ्या भावावर गोळी झाडली. ती गोळी माझ्या भावाच्या बरगड्यांजवळ लागली. त्यामुळे त्याला थोडीशी इजा झाली. त्यानंतर माझा भाऊ स्वत:ला वाचवण्यासाठी पळत होता. तो इमारतीचे चार-पाच मजले चढून वर आला. त्याला धावताना दम लागल्यामुळे तो लिफ्टजवळ खाली पडला. त्यावेळी राम सागरने माझ्या भावाच्या डोक्यात आठ वेळा चाकू खुपसला. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे रंजीत दुबेच्या बहिणीने सांगितले.