शहापूर : भिवंडी लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या निवडणुक प्रचारात विश्वासात न घेतल्याने शहापूर तालुक्यातील सर्व नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक तालुकाध्यक्ष देवेंद्र भेरे यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आली.
या बैठकीत सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपली नाराजी प्रकट केली. यावेळी तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते, विभाग अध्यक्ष, बूथ कार्यकर्ते व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बबन शेलवले, मुकुंद पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीपत संगारे, मार्तंड अधिकारी, कादिर शेख, प्रभाकर पवार, एकनाथ वेखंडे, नथुराम विशे, सुरेश पानसरे, मुकुंद वेखंडे, रामचंद्र देशमुख, संतोष पडवळ, महादू धामणे, मल्हारी देसले, पद्माकर देसले, गुरुनाथ देसले, गोपाळ वाघ यांनी मार्गदर्शन केले.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नावाची बदनामी केली जात असून ती खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. आघाडीचे पदाधिकारी काँग्रेसच्या तालुका पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नसल्याने महविकस आघाडीच्या प्रचार यात्रेत सहभागी न होण्याचे सर्वांनी एकमताने ठरवले. सदर कार्यक्रमवेळी जिल्हा आदिवासी आघाडी अध्यक्ष दत्तात्रय बरोरा, सहकार आघाडी अध्यक्ष नामदेव गगे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष अन्वर शेख, अनुसूचित जाती अध्यक्ष संतोष साळवे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संतोष ढोंन्नर यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कसारा शहरातील वंचित आघाडीच्या युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.