मध्य रेल्वेची सेवा कोलमडली

ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान सिग्नल, पॅनल यंत्रणा ठप्प झाल्याने सहाव्या मार्गिकेवरील रेल्वे वाहतूक आज सकाळी साडे नऊच्या सुमारास ठप्प झाली. मरे सेवा कोलमडल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना लेटमार्क लागला आहे.

मध्य रेल्वेची सेवा कोलमडल्याने कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे परिसरातील चाकरमान्यांची चांगलीच तारेवरची कसरत झाली. मुंबईच्या दिशेने जाणार्‍या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळाली. अखेर रेल्वे प्रशासनाच्या कर्मचार्‍यांनी तब्बल एक तासानंतर रेल्वे सुरु केली. मात्र त्यानंतर लोकल एक तास उशिरा धावत होत्या. त्याचा फटका चाकरमान्यांना बसला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वे सेवेत बिघाड झाल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.