ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेल्या मतदार यादीवर सुमारे दोनशे हरकती आणि सूचना आल्या आहेत. त्यावर निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे.
महापालिका हद्दीतील १४२ नगरसेवकांसाठी तयार करण्यात आलेल्या ४७ प्रभागातील मतदारांच्या नावाची यादी महापालिकेने २३ जून रोजी प्रसिद्ध केली होती. या मतदार यादीवर हरकती घेण्याची काल 3 जुलै ही शेवटची तारीख होती. २११ जणांनी या मतदार यादीवर हरकत घेतली आहे. एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागातील मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे. एका इमारतीमधील नावे दुसऱ्या मतदार यादीत टाकण्यात आली. अशा प्रकारच्या या हरकती आहेत.
सर्वात जास्त ५८ तक्रारी माजिवडे मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील मतदारांनी केल्या आहेत. प्रभागाची हद्द कायम केली असतानाही मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याच्या तक्रारी या प्रभागातून करण्यात आल्या आहेत. दिवा ४१ आणि मुंब्रा प्रभाग समिती परिसरातून ३४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वर्तकनगर प्रभाग समितीमधून २५, उथळसर येथून १७ आणि लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती भागातून १३ जणांनी या मतदार यादीवर हरकत घेतली आहे. कळवा प्रभाग समितीमधून १० जणांनी नौपाडा-कोपरीमधून आठ आणि वागळे प्रभाग समिती क्षेत्रातील पाच नागरिकांनी या मतदार यादीवर हरकत घेतली आहे. हरकती-सूचनांबाबत सुनावणी घेऊन १३ जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.