दर्जेदार कामांच्या आग्रहाने ठेकेदारांची तंतरली
ठाणे : शहरातील साफसफाईनंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आपला मोर्चा रस्ते आणि इतर नागरी सुविधा या कामांकडे वळवला आहे. आयुक्त स्वतः कामाच्या ठिकाणी जाऊन बारकाईने पाहणी करत आहेत, प्रसंगी अधिकाऱ्यांना धारेवर धरत आहेत, त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदारांची धाबे दणाणले आहे.
शहरातील रस्ते, गटार दुरुस्ती, गटार बांधणे, पदपथ दुरुस्ती, रंगरंगोटी, उद्यान, वृक्षारोपण आणि रस्ते सफाई या कामावर महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनी लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील सुरू असलेल्या कामाची ते अचानक पाहणी करण्यासाठी दरदिवशी शहरातील विविध भागात अचानक दौरा करतात. जागेवर गेल्यानंतर त्या परिसरतील कार्यकारी अभियंता, उपायुक्त, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून कामातील कमतरता दाखवून देत आहेत. ज्या कामाचा दर्जा नाही त्या कामाचे ठेकेदाराला बिल देण्यात येऊ नये. त्यांच्याकडून उत्तम दर्जेदार काम करून घ्यावे, कामाच्या फायली देखिल नियमात बसून कराव्यात. कोणत्याही प्रकारची बोगस फाईल होणार नाही याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. फाईल तयार करताना त्याची निकड, त्याचे फोटो असणे आवश्यक आहेत. कामासाठी निधी उपलब्ध आहे किंवा नाही याची खातरजमा करावी, नंतरच कामाला मंजुरी घेऊन त्यानंतर निविदा काढाव्यात, अशा सक्त सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या आहेत.
महापालिकेतील अभियंत्यांनी मुख्यालयात न बसता ज्या ठिकाणी नागरी सुविधांची कामे सुरू आहेत तेथिल कामावर देखरेख ठेऊन कामाचा दर्जा पहावा. दर्जेदार काम झाले नाही, बोगस फाइल बनून जर बिल काढल्याचे निदर्शनास आले तर अधिकारी आणि ठेकेदारांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा श्री. बांगर यांनी दिला आहे.
साईटवर असल्याचे सांगून घरी किंवा इतर ठिकाणी मजा मारणाऱ्या अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे आयुक्त बांगर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याने काही अधिकारी स्वेच्छा निवृत्ती घेण्याच्या विचारात असल्याचे समजते. महापालिकेत वेळेवर कामाला न येणाऱ्या काही महिला कर्मचारी देखिल वेळेवर कामाला येऊन उशिराने जावे लागत असल्याने घरी बसण्याचा विचार करत आहेत.