पिझ्झा कंपनीत सफाई करताना शॉक लागून झाला होता मृत्यू
ठाणे : डॉमिनोज पिझ्झा कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करणाऱ्या मनीषचा साफसफाई करताना विजेचा धक्का लागून काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. आमदार संजय केळकर यांच्या दणक्यानंतर एकाकी झालेल्या त्याच्या वृद्ध आईला २५ लाखांची आर्थिक मदत मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.
घरची गरिबी, वडील हयात नाहीत, आई गृहिणी…घरात कमवता कोणीच नाही. अशा हलाखीच्या परिस्थितीत मनीष कदम शिकण्याचे वय असताना गरज म्हणून डॉमिनोज पिझ्झा कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला लागला. कंपनीचे नियुक्ती पत्र नाही की कोणतीही हमी नाही, तरीही तो घर चालवण्यासाठी काम करत होता.
एके दिवशी मनीषला कंपनीत दुसरे काम दिले गेले, ते काम करताना त्याला विजेचा धक्का बसला आणि तो मृत्यू पावला. नोकरीला सहा महिनेच झालेले असताना त्याच्या मृत्यूने त्याच्या आईवर संकटाचे आभाळ कोसळले. तिला नुकसान भरपाई मिळावी म्हणून नातेवाईकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, पाठपुरावा केला, पण दाद मिळाली नाही.
अखेर नातेवाईकांनी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्याकडे संपर्क साधला. त्यांनी संबंधित सर्व शासकीय विभाग आणि कंपनी प्रशासनाशी संवाद साधून डॉमिनोज कंपनीला भरपाई देण्यास भाग पाडले. गेलेल्या माणसाची कशानेच पोकळी भरुन निघू शकत नाही. पण कुटूंबाची उपासमार थांबावी म्हणून आमदार केळकर यांनी केलेले प्रयत्न कामी आले. अखेर मनीषच्या आईला कंपनीने २५ लाखांचा धनादेश प्रदान केला. तसेच कुटुंबातील एकास नोकरी देण्याची हमीही दिली. याबाबत मनीषच्या नातेवाईकांनी साश्रू नयनांनी आ. केळकर यांचे आभार मानले.