ठाण्याच्या कचऱ्याचा मार्ग मोकळा; भंडार्लीकरांचा विरोध मावळला?

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत गावकरी सकारात्मक

ठाणे : भंडार्ली येथील सुरू असलेला ठाणे महापालिकेचा डम्पिंग तात्पुरता असून त्याचा ग्रामस्थांना कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज १४ गाव विकास समितीला दिले. आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने ठाणेकरांच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मार्गी लागल्याचे तूर्त स्पष्ट झाले आहे.

भंडार्ली येथे एक वर्षासाठी तात्पुरत्या स्वरुपात डम्पींग सुरु करण्यासाठी पालिकेने हालचाली सुरु केल्या होत्या. परंतु येथील रहिवाशांनी त्याला विरोध केल्याने डम्पींगचे काम रखडले होते. तसेच या संदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चर्चा घडवून आणण्याची विनंती देखील गावकऱ्यांनी केली होती. त्यानुसार शुक्रवारी महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.

या बैठकीला महापौर नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. रहिवाशांची समजूत काढण्यात आली असून येथे कोणत्याही स्वरुपाचे कायमस्वरूपी डम्पींग होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच येथील रहिवाशांना कोणत्याही स्वरुपात दुर्गंधीचा त्रास होणार नसल्याचेही आश्वासन देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. एक वर्षासाठीच येथे डम्पींग असून त्याठिकाणी शास्त्रोक्तपध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार गावकरी देखील त्यादृष्टीने सकारात्मक असून एक आठवडय़ात ते निर्णय देणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

डम्पींगला आमचा विरोध हा कायम आहे. परंतु पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले असून आमच्या समस्या देखील सोडविण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार एक आठवड्यात सर्व गावकऱ्यांशी चर्चा करुन पुन्हा बैठक घेऊन निर्णय जाहीर केला जाणार आहे. परंतु आम्ही यासाठी आता सकारात्मक आहोत, असे समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.

भांडर्लीसह १४ गावांचा नवी मुंबईत समावेश करणार

भंडार्ली तसंच आसपासच्या १४ गावांचा नवी मुंबईत समावेश करण्याबाबत सर्व तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नावळी, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिसर मोरी ही १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात यावीत, अशी मागणी आहे.

ग्रामपंचायत असल्याने वाढत्या नागरिकीकरणानुसार गावात सुविधा पुरवू शकत नाहीत. शहरीकरण झपाट्याने वाढत असल्याने हा विकास गावांतही व्हावा म्हणून अशी मागणी येथील ग्रामस्थ गेल्या काही वर्षांपासून करत आहेत. काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांच्या विरोधामुळे ही गावे महापालिकेतून वगळली होती. आता पुन्हा ती समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आधी गावे वगळा यासाठी हिंसक झालेले ग्रामस्थ आज इतक्या वर्षांनी महापालिका हवी अशी मागणी करू लागले आहेत.

नवी मुंबई महापालिकेत या १४ गावांचा समावेश करावा, अशी मागणी होती. नगरविकास विभागाच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मी दिलं आहे. कायदेशीर आणि तांत्रिक बाबी तपासून तो निर्णय घेतला जाईल. सर्व १४ गावांचा विकास महत्वाचा आहे. पालिकेच्या, राज्य सरकारच्या, नगरविकासाच्या माध्यमातून लोकांना मुलभूत सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

ही १४ गावे सुरुवातीला नवी मुंबई महापालिकेत होती. वाढीव मालमत्ता कराच्या मुद्द्यावर ती वगळावीत यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. हा वाद इतका टोकाला गेला होता की गावातून निवडणूक अर्ज दाखल करणाऱ्या दोघा उमेदवारांची घरे जाळण्यात आली होती. अखेर तत्कालीन काँग्रेस सरकारने ती गावे वगळली.