ठाणे : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्या प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात येणार असून त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी त्यांच्या समर्थक शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. या पूर्वी असे स्वागत कुणाचे झाले नाही असे स्वागत करण्याचा निर्धार आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांना घेऊन सेनेच्या विरोधात बंड केले. त्यानंतर भाजपाबरोबर युती करून राज्यात भाजपा-शिंदे समर्थक आमदारांचे सरकार राज्यात स्थापन करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ठाण्यातील नागरिकांनी त्याचे स्वागत केले होते. मागील तीन दिवस समर्थक आमदार आणि भाजपच्या बैठकीमध्ये वेळ गेल्यानंतर उद्या विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर श्री. शिंदे हे दुपारी तीन वाजता ठाण्यात येणार आहेत. ठाण्याच्या वेशीवर (आनंदनगर जकात नाका) येथे शिवसैनिक त्यांचे जंगी स्वागत करणार आहेत. त्यानंतर खोपटमार्गे शक्तीस्थळ येथे जाऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे हे आनंद दिघे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन टेम्भी नाका येथील आनंद मठ येथे येऊन कार्यकर्त्यांना भेटणार आहेत.
आनंद मठ येथे शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे एका पदाधिकाऱ्यांने सांगितले.