विविध उपक्रमांचा होणार शुभारंभ
ठाणे : राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर एकनाथ शिंदे हे उद्या प्रथमच ठाणे महापालिकेत येत आहेत. त्यांच्या हस्ते शहर सुशोभिकरण आणि स्वच्छता अभियानाचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री महापालिकेत प्रथमच येणार असल्याने महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मागील काही महिन्यांपासून शहर सुशोभिकरणाला सुरवात झाली आहे. स्वच्छता मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे. शहरातील विविध रस्ते, उड्डाणपुल, गृह संकुलाच्या संरक्षक भिंतीही विविध रंगांनी सजविण्यात आल्या आहेत. स्वच्छतेच्या बाबतीतही महापालिका क्रमांक एकवर येण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह पालिकेने कंबर कसली आहे. मागील काही दिवसात त्याचा परिणाम देखील ठाण्याच्या विविध भागात दिसून आला आहे. त्याच अनुषंगाने आता, मुख्यमंत्री स्वच्छता अभियान आणि शहर सौंदर्यीकरण अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
शनिवारी सकाळी ११.३० वाजता महापालिका मुख्यालयात ते उपस्थित राहणार असून या अभियानाचा शुंभारभ केला जाणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे मुख्यालय सुशोभिकरण केले जात असून साफसफाई देखील केली जात आहे.
यापूर्वी २०१९ मध्ये क्लस्टर योजनेचा शुभारंभ करण्यासाठी ते महापालिका मुख्यालयात आले होते. त्यानंतर आता ते येत आहेत, परंतु आता ते मुख्यमंत्री म्हणून येणार असल्याने याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. त्यातही आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतांना त्यांनी देखील महापालिका मुख्यालयात हजेरी लावली होती.