टीएमटी बस जळून खाक

ठाणे: लोकमान्य नगर येथील डेपोत प्रवासी घेण्यासाठी गेलेल्या ठाणे परिवहन सेवेच्या बसला आग लागून ती संपूर्ण जळून खाक झाली. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने जीवितहानी टळली.

वृंदावन येथून लोकमान्य नगर येथील प्रवासी सोडून काही काळ विश्रांती करिता लोकमान्य नगर डेपोमध्ये बस थांबली असताना ५ च्या दरम्यान या बसने अचानक पेट घेतला. आग इतकी भयानक होती की आगीच्या ज्वाला दूरवरून दिसत होत्या.

या घटनेची माहिती जवाहर बाग अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवान देखील दुर्घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी एक अग्निबंब, पाण्याचा टँकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाने एक पिकअप वाहनांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली.

बसला कशामुळेआग लागली हे समजू शकले नाही, परंतु शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.