भिवंडी: नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना २४ जून रोजी घडली होती. या घरफोडीत घरातील १२ तोळे सोन्याचे दागिने असा जवळपास चार लाख ९३,३५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या गुन्ह्याचा तपास नारपोली पोलिसांसह भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस करत होते. या घरफोडीतील चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या चोरट्याकडून घरफोडीतील मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे.
निलेश जाधव (२२) रा.काटई गाव असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्याने चोरी केलेले १२ तोळे सोन्याचे दागिने ज्याची किंमत ४,९३,३५० असून हा मुद्देमाल जप्त करून आरोपीस नारपोली पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांचे देखरेखीखाली सपोनि विजय मोरे, सपोनि प्रफुल्ल जाधव, सपोनि धनराज केदार, पोउपनिरी रमेश शिंगे, सपोउनि रविंद्र पाटील, सपोउनि राजेंद्र चौधरी, पोहवा देवानंद पाटील, पोना साबिर शेख आदींच्या पथकाने केली असल्याची माहिती गुन्हे शाखेकडून मिळाली आहे.