इच्छुकांची न्यायालयात जाण्याची तयारी
ठाणे : ठाणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार प्रभागांची मोडतोड झाल्यान हक्काची मते जाण्याची भीती काही माजी नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ही मंडळी न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.
ठाणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असली तरी ती आता न्यायालयीन प्रक्रियेत अडकण्याची दाट शक्यता आहे. जाहीर झालेली प्रभाग रचना ही राजकीय मंडळीना फारशी रुचली नसून विशेष करून यासंदर्भात सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. अंतिम प्रभाग रचनेत अपेक्षित बदल व्हावे यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली होती. यामध्ये सत्ताधारी शिवसेना पक्षाने संपूर्ण फौजच या कमी उभी केली होती. मात्र यामध्ये हवे असलेले अपेक्षित बदल निवडणूक विभागाकडून झालेले नसल्याने आता याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी काही राजकीय मंडळीनी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रभाग क्रमांक ३, ४, आणि ९ हे प्रभाग सुरुवातीला आडवे होते. मात्र अंतिम प्रभाग रचनेत हे प्रभाग उभे करण्यात आले आहेत. रुणवाल सोसायटी हा एका प्रभागाचा भाग होता. या भागाला राबोडी आणि कोळीवाडा जोडण्यात आला जो दुसऱ्या प्रभागाचा भाग होता. त्यामुळे एका प्रभागाची लोकसंख्या वाढली तर दुसऱ्या प्रभागाची कमी झाल्याने हक्काची मते जाण्याची शक्यता निर्माण झाली. प्रभाग क्रमांक २७ ची लोकसंख्या ही ३५१२६ होती ती अंतिम प्रभाग रचनेत ३४,६८७ करण्यात आली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून नागरिक न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक २५ ची लोकसंख्या ही ४२ हजार असून प्रभाग क्रमांक २२ ची लोकसंख्या ही ३५,२०० आहेत. त्यामुळे प्रभागातील असमान लोकसंख्येचा मुद्दा न्यायालयात मांडण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यांवरून खाडीच्या पलिकडे देखील नाराजीचे वातारण असल्याने या परिसरातील नागरिकही न्यायालयात जाण्यासाठी पाठिंबा देण्याची शक्यता आहे.