महिला पोलिसाला धक्का लागल्याचं दाखवलं तर मी राजकारण सोडेन : संदीप देशपांडे

मशिदींवरील भोंग्यावरोधात आंदोलन करुन मुंबई पोलिसांच्या तावडीतून पळ काढणारे संदीप देशपांडे 16 दिवसांनी मुंबईत परतले. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर अनेक आरोप केले.

मुंबई : “आमच्यावरील गुन्हा खोटा होता. खोट्या गुन्ह्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस आम्हाला शोधत होते. मीडियामधील फूटजे आमच्या वकिलांनी कोर्टात दाखवलं. त्यावरुन स्पष्ट झालं की आम्ही कोणताही गुन्हा केला नव्हता. आम्ही सरकारविरोधात बोलू नये म्हणून सरकारने दबाव बनण्यासाठी हे सगळं केलं. आमचा कायद्यावर आणि न्यायालयावर विश्वास होता. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला,” असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं. “महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागल्याचं दाखवलं तर मी राजकारण सोडेन,” असं संदीप देशपांडे म्हणाले. तसंच ठाकरे सरकार सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप देखील देशपांडे यांनी केला. संदीप देशपांडे 16 दिवसांनी मुंबईत परत आले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर अनेक आरोप केले.

“माझ्याकडे एका न्यूज चॅनलचं फूटेज आहे. त्याचे स्क्रीन शॉट काढले आहेत. बोलेसे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याचा महिला पोलिसाला धक्का लागला. अशाप्रकारे सरकारने पोलीस स्टेशनवर दबाव बनवून फूटेजमधले शॉट्स कट करुन काहीतरी केलं. गुन्हे दाखल करुन राजकीय सूड उगवला,” असं देशपांडे म्हणाले. “केंद्र सरकार सुडाचं राजकारण करतं असं उद्धव ठाकरे सभेत म्हणाले, तुम्ही काय करताय? महिला पोलिसाला आमचा धक्का लागल्याचं एकतरी फूटेज दाखवलं तर संदीप देशपांडे राजकारण सोडून देईन,” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला का आतापर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन
मशिदींवरील भोंग्यावरोधात आंदोलन करुन मुंबई पोलिसांच्या तावडीतून पळ काढणाऱ्या मनसे नेते संदीप देशपांडे यांना अखेर दिलासा मिळाला आहे. देशपांडे यांच्यासह संतोष धुरी यांना गुरुवारी (19 मे) मुंबई सत्र न्यायालयान 15 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यांच्यासोबत देशपांडेच्या गाडी चालक आणि शाखाध्यक्षालाही न्यायालयाने जामीन देत दिलासा दिला आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 4 मे रोजी ठिकठिकाणी मनसैनिकांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यभरात पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु करुन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यातच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे आणि नेते संतोष धुरी यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी ‘शिवतीर्थ’ इथे गेले असताना देशपांडे आणि धुरी गाडीतून पळून गेले. गाडी भरधाव वेगात दामटवताना त्याची एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला धडक बसली आणि त्या जागेवरच कोसळल्या होत्या. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी देशपांडेसह गाडी चालक, शाखाध्यक्ष संतोष साळी आणि संतोष धुरीविरोधात आयपीसी कलम 308, 353, 278 आणि 336 नुसार शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.