मुंब्रा बायपासवर तेलाचा टँकर उलटला
ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्गावर खाद्यतेल वाहून नेणारा टॅंकर मध्यरात्री उलटला. टॅंकरमधील तेल रस्त्यावर सांडल्याने सोमवारी सकाळपासून ठाणे शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. घोडबंदरसह अन्य मुख्य रस्त्यांवर झालेल्या वाहतूक कोंडीत शाळा बससह खासगी बस अडकल्याने विद्यार्थी आणि चाकरमान्यांचा नाहक खोळंबा झाला.
गुजरातहून अंबरनाथच्या दिशेने एक खाद्यतेल वाहून नेणारा टॅंकर निघाला होता. या टॅंकरमध्ये ३३ टन तेल होते. टॅंकर मुंब्रा बाह्यवळण मार्गावर आला असता, वाहन चालकाचा ताबा सुटला आणि टॅंकर रस्त्यावर उलटला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तेल रस्त्यावर सांडले. त्यामुळे दोन्ही दिशेकडील वाहतूक थांबविण्यात आली होती. सकाळी ६च्या सुमारास यंत्राच्या मदतीने अग्निशमन दलाने रस्त्यावर सांडलेले खाद्यतेल काढले. परंतु या अपघाताचा परिणाम शहरातील वाहतूकीवर झाला. घोडबंदर मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पाच मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना पाऊण तास लागत होता. शाळेच्या बसगाड्याही वाहतूक कोंडीत अडकून बसल्याने विद्यार्थी वेळेत शाळेमध्ये पोहचले नाहीत. सकाळी १०:३०च्या सुमारास येथील वाहतूक सुरळीत झाली. परंतु वाहतूक कोंडीच्या कालावधीत अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामावर पोहचता आले नाही. महिला प्रवाशांचे यामध्ये सर्वाधिक हाल झाले.
या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागलेल्या नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. ठाणेकर रहिवासी असलेले सुनील उदावंत यांनी प्रतिक्रिया देताना केवळ मानपाडा ते कापूरबावडीच्या दरम्यान प्रवास करण्यासाठी मला बराच वेळ लागल्याने वाहतूक कोंडीत अडकून पडून राहावे लागले. त्यामुळे पुढच्या कामालाही मला वेळ झाला, अशी संतप्त प्रतिक्रिया सुनील उदावंत या ठाणेकराने व्यक्त केली.