ठाणे : गेल्या सहा महिन्यांपासून कोपरीकरांना पाणीटंचाई भेडसावत असून सोमवारी शिवसेना विरुध्द भाजप असा सामना रंगल्याचे दिसून आले.
सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी कोपरी भागातील वॉटरफ्रन्ट डेव्हल्पमेंटचा पाहणी दौरा केला. यावेळी शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता पमनानी, मालती पाटील यांनी पाणी टंचाईबाबत त्यांच्याशी चर्चा केली. मागील अनेक दिवसापासून या भागात पाण्याची समस्या आहे. तसेच धोबी घाट भागातील पाण्याची टाकी जुनी झाली असून त्याठिकाणी नवीन वॉल बसविणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार हा व्हॉल्व आला असतांनाही तो बसविण्यात न आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा व्हॉल्व्ह तत्काळ बसविण्यात यावा अशी मागणी करीत पाण्याची समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी घेतले. एकूणच पाण्याची समस्या आमच्यामुळेच मार्गी लागल्याचा दावाही त्यांनी केला.
मुळात कोपरीत पाणी कमी का येत आहे, याची माहितीच या मंडळींना नसल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी केला आहे. कोपरीला यापूर्वी मुंबई महापालिकेकडून २२ दशलक्ष लीटर पाणी येत होते. त्यातील सहा एमएलडी पाणी ठाणे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी इतरत्र वळविले आहे. त्यामुळे कोपरीकरांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी आम्ही यापूर्वी पालिकेवर हंडा मोर्चा काढला होता. तसेच लोकसंख्या वाढत असल्याने वाढीव सहा एमएलडी पाण्याची मागणी देखील केली होती. त्यानुसार हे वाढीव पाणी देण्याचा आश्वासन देखील पालिकेने दिले असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु आता मात्र त्याचे श्रेय दुसरेच घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एकूणच कोपरीकरांची पाण्याची समस्या सुटेल की नाही हे सांगता येणे सध्यातरी शक्य नसले तरी पाण्यावरुन राजकारण मात्र चांगलेच तापल्याचे दिसत आहे.