व्हीडिओ झाला व्हायरल
ठाणे : भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले ठाणे रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्याला चोप देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. फेरीवाल्यांकडून उलटसुलट उत्तरे आल्यानंतर चोप दिल्याचे वाघुले यांनी बोलताना सांगितले.
कोरोना काळात फेरीवाले कमी झाले होते, मात्र जसजसे निर्बंध कमी होऊ लागले तसतशी फेरीवाल्यांची संख्या वाढू लागली. त्यांनी पूर्वीसारखेच आपले बस्तान थाटण्यास सुरुवात केली आहे. यामुळे येथून नागरिकांना चालणेही दुरापास्त झाले आहे. या संदर्भात आलेल्या काही तक्रारीनुसार आपण आठ दिवसांपूर्वी त्या परिसरात पाहणी करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी फेरीवाल्यांना विचारणा केल्यावर त्याने उलटसुलट उत्तरे दिल्यावर संतप्त झालेले नगरसेवक वाघुले यांनी फेरीवाल्यांना चोप दिला.
फेरीवाल्यांबाबत वारंवार तक्रारी करून, स्मरणपत्रे देऊन आणि महापालिका अधिकाऱ्यांना फेरीवाल्यांचे फोटो पाठवून काही उपयोग होत नाही. मात्र पालिका अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यावर ते कारवाई करतात. लोकप्रतिनिधींना कोणी जुमानत नाही. या फेरीवाल्यांविरोधात लवकरच आंदोलन करणार असल्याचेही वाघुले यांनी सांगितले.