मालकाच्या भाडेवाढीने भंडार्लीचा घनकचरा प्रकल्प संकटात

ठाणे : वर्ष उलटूनही भंडार्ली येथिल ठामपाचा घनकचरा प्रकल्प सुरू झालेला नाही. अशात जागा मालकाने प्रती चौरसफुटामागे आठ रुपये दर मिळावा अशी मागणी केली आहे. तर पालिका ५.५० रुपये दरावर ठाम आहे, त्यामुळे प्रकल्पाचा गुंता आणखी वाढू लागला आहे.

भंडार्ली येथे शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा विघटन प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर झाल्यानंतर आता वर्षभरानंतर कचरा प्रकल्पाच्या निगा देखभालीसाठी तीन निविदा प्राप्त झालेल्या आहेत. परंतु शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमुळे त्या निविदा उघडता आलेल्या नाहीत. हा अडथळा असतांनाच आता वर्ष संपल्याने जागा मालकाबरोबर पुन्हा भाडेकरार करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. परंतु आता जागा मालकाने प्रती चौरसफुटामागे आठ रुपये दर मिळावा, अशी मागणी केली आहे. परंतु पालिका ५.५० रुपये देण्यावर ठाम असल्याने हा नवा तिढा आता निर्माण झाला आहे.

मौजे भंडार्ली येथील अंदाजे १० एकर जागा इतकी खाजगी जागा भाडेतत्वावर महापालिकेने ताब्यात घेतली. या जागेवर जाण्यासाठी रस्त्याचे काम केले गेले आहे. तसेच इतर कामांसाठी नऊ कोटींचा खर्च पालिकेने केला आहे. तसेच एक वर्षाचा भाडेकरार करण्यात आला. त्यापोटी पालिकेने महिनाकाठी २० लाखांचे भाडेही दिले आहे. आता डिसेंबरमध्ये भाडे करार संपुष्टात आला आहे. परंतु अद्यापही हा प्रकल्प सुरु झालेला नाही. त्यात महापालिकेने यापूर्वी जी निविदा काढली होती, त्याला तब्बल नऊ वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु तरी देखील निगा देखभालीसाठी पालिकेला ठेकेदार मिळाला नव्हता. परंतु आता दिव्यातील नागरीकांनी डम्पींगच्या विरोधात आवाज उठविल्यानंतर झोपी गेलेल्या पालिकेने आता भंडार्ली प्रकल्पासाठी नव्याने निविदा काढली आहे. त्याला तिघांनी प्रतिसाद दिला आहे, परंतु शिक्षक मतदार संघाच्या लागलेल्या आचरसंहितेमुळे ही निविदा उघडता आलेली नाही. त्यामुळे आता महापालिका शासनाकडे पत्रव्यवहार करणार असून अत्यावश्यक बाब म्हणून निविदा उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.