अश्विन शेळकेची अष्टपैलू कामगिरी; युनायटेड पटणी इंडस्ट्रीज ‘क गटाच्या अंतिम फेरीत

भूषण शिंदे, बीनेट कम्युनिकेश (डावीकडे) आणि अश्विन शेळके, युनायटेड पटणी इंडस्ट्रीज

दादोजी कोंडदेव स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या 48व्या ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या ‘क’ गटाच्या उपांत्य फेरीत युनायटेड पटणी इंडस्ट्रीजने बीनेट कम्युनिकेशनचा चार गडी राखून पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना बीनेट कम्युनिकेशनचा डाव 34 षटकांत 175 धावांत आटोपला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या भूषण शिंदेने 34 चेंडूत 43 धावा केल्या. शिंदेचा डाव तीन चौकार आणि दोन षटकारांनी रंगला. त्याच्याशिवाय, सलामीवीर दीपक भोगले (36 चेंडूत 31 धावा) याने बीनेट कम्युनिकेशनसाठी फलंदाजीत मोठे योगदान दिले. युनायटेड पटणी इंडस्ट्रीजसाठी, लेफ्ट आर्म स्पिनर्सची जोडी, अश्विन शेळके आणि पार्थ चंदन हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. त्यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

प्रत्युत्तरात युनायटेड पटणी इंडस्ट्रीजने 33.4 षटकांत चार विकेट्स आणि आठ चेंडू राखून एकूण धावसंख्या गाठली. सलामीवीर अरमान पठाणने (49 चेंडूत 32 धावा) चांगली सुरुवात केल्यानंतर शेळके (25 चेंडूत नाबाद 47) याने जबाबदारी स्वीकारली आणि संघाला विजय मिळवून दिला. पहिल्या डावात चेंडूने चमकलेला शेळके याने दुसऱ्या डावात फलंदाजीत मोलाची भूमिका बजावली. त्याने आपल्या मनोरंजक खेळीत दोन चौकार आणि चार षटकार खेचले. बीनेट कम्युनिकेशनसाठी सिद्धार्थ घुले याने दोन गडी बाद केले.

 

संक्षिप्त धावफलक:  बीनेट कम्युनिकेश 34 षटकांत 175 सर्वबाद (भूषण शिंदे 43; अश्विन शेळके 3/31) पराभूत वि. युनायटेड पटनी इंडस्ट्रीज 33.4 षटकांत सहा गडी बाद 177 (अश्विन शेळके 47 नाबाद; सिद्धार्थ घुले 2/36)