ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांच्या विरोधात आज शहरातील मोक्याच्या ठिकाणी ५० खोक्यांचा उल्लेख असलेले बॅनर लागल्याने शिंदे गट आक्रमक झाला आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तातडीने हे बॅनर हटवले. पोलीस बॅनर लावणाऱ्यांचा शोध घेत आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ५० खोक्यांचा मुद्दा महाराष्ट्रात गाजला होता. ठाकरे गट शिंदे गटाच्या विरोधात मेळावे आणि सभांमध्ये ५० खोक्यांचा मुद्दा उपस्थित करत असतात. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात राहत असलेल्या परिसरात ‘५० खोके खाऊन माजले बोके, जमिनीचे श्रीखंड कोणी खाल्ले? अशा उल्लेखाचे बॅनर लावण्यात आले होते. याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला तक्रार करण्यात आल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तातडीने कारवाई करून हे बॅनर काढून फाडून टाकले.
याबाबत शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के संतप्त झाले असून त्यांनी विनापरवाना बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. रात्रीच्या अंधारात हे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यांच्यात हिंमत होती तर त्यांनी दिवसा हे बॅनर लावून दाखवावे, असे आव्हान बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी विरोधकांना दिले आहे. हे बॅनर कोणी लावले त्याची माहिती आहे. लवकरच त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असेही श्री. म्हस्के म्हणाले.