जास्तीत जास्त पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी प्रयत्न करावेत

सल्लागार समितीत निर्देश

ठाणे : जिल्ह्यातील अग्रणी बँकांच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बँकांनी त्यांना नेमून दिलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्ह्यातील बँकांच्या सल्लागार समितीच्या बैठकीत पीक कर्ज, मुद्रा योजना, सूक्ष्म प्रक्रिया योजना, प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मीती योजना यासह विविध शासकीय योजनांना केलेला वित्त पुरवठा, राज्य शासनाच्या महामंडळामार्फत लाभार्थ्यांना करण्यात आलेले कर्ज पुरवठा आदी विषय़ी या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, लिड बँकेचे व्यवस्थापक जे. एन. भगत, जिल्हा कृषि अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच बँकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावर्षीच्या वार्षिक व्याज योजना पुस्तिकेच जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्याला 267 कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्व बँकांनी शेतकऱ्यांपर्यंतं जाऊन कर्ज वाटप करावे. तसेच महामंडळाच्या योजनांच्या लाभार्थ्यांना वित्त पुरवठा करताना येणाऱ्या अडचणी दूर करून लवकरात लवकर कर्ज प्रकरणे मंजुर होतील, याकडे लक्ष देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.