ट्रॅफिक वॉर्डनवर हल्ला

एमआयएम कार्यकर्त्याला अटक

ठाणे : रूग्ण वाहिकेला जाण्यासाठी मार्ग करून देताना थांबविण्याची विनंती करणाऱ्या ट्राफिक वॉर्डनवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एमआयएमच्या कार्यकर्त्याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.

गफार शेख असे आरोपीचे नाव आहे. आज सायंकाळी ५च्या सुमारास मुंब्रा कौसा येथील शिमला पार्क तलाव येथे इब्राहिम हा वाहतूक नियमनाचे काम करत होता. तेथे वाहतूक कोंडी झाली होती. त्याच दरम्यान पनवेलच्या दिशेने एक रूग्णवाहिका जात होती. त्यावेळी गफार शेख हा त्याच्या दुचाकीवरून रूग्ण वाहिकेला ओव्हरटेक करून जात असताना ट्राफिक वॉर्डनने त्याला थांबण्याची विनंती केली. त्याचा त्याला राग आला. त्याने वॉर्डनबरोबर बाचाबाची करून त्याच्या गालावर चापट मारून रस्त्यावर फळे विक्री करणाऱ्याकडील सुरा घेऊन वॉर्डनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला पकडले. काही क्षणातच मुंब्रा पोलीस तेथे पोहचले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.