कल्याण : कल्याणमध्ये उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेचे उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या माणसांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप हर्षवर्धन पालांडे यांनी केला असून महेश गायकवाड यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. आज सकाळी उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे काही कामानिमित्त आपल्या गाडीने जात असताना तीन ते चार अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. पालांडे यांचा आरोप आहे की, हल्लेखोर यांच्या हातात लोखंडी रॉड आणि तलवार या धारदार शस्त्र होते. शिवसेनेत तू जास्त उडतोय असे सांगत हल्लेखोराने पालांडे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पालांडे जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
कल्याणच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळतात कल्याण आणि उल्हासनगर मधील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये जमा झाले. पालांडे यांचा आरोप आहे की या हल्ल्यामागे शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचा हात असून त्यांच्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला आहे. पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. तर याबाबत माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी सुरू केला आहे.