दोन कनिष्ठ अभियंत्यांकडून कार्यकारी अभियंत्यांच्या हत्येची सुपारी

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्या हत्येकरीता २० लाखांची सुपारी देणारे याच महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता श्रीकृष्ण मोहिते आणि यशवंत देशमुख यांना कस्तुरबा पोलीसांच्या गुन्हे अन्वेशन विभागाने अखेर अटक केली आहे. या अटकेमुळे मीरा-भाईंदर महानगरपालिकेत प्रचंड खळबळ माजली आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिका कार्यकारी अभियंता यांच्यावर मागील २९ तारखेला कार्यालयातून घरी जात असताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या उड्डाणपुलाच्या खाली वळण घेत असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या संदर्भात कस्तूरबा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून त्याच्या तपास सुरु होता.
या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान हल्लेखोरांच्या शोधाकरीता मीरा-भाईंदर, नालासोपारा, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आदि ठिकाणी पोलीसांची पथके पाठविण्यात आली होती. तद्नंतर यातील एका आरोपीला मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करुन उत्तर प्रदेशातून अटक केली होती. व त्यानंतर त्या आरोपीला कस्तूरबा मार्ग पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले होते.

या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता या प्रकरणात मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील ठेकेदार राजू विश्वकर्मा यांचा सहभाग आढळून आला होता. इतकेच नव्हे तर या गुन्ह्यात महानगरपालिकेतील दोन कनिष्ठ अभियंता श्रीकृष्ण मोहिते आणि यशवंत देशमुख यांनी खांबित यांच्या हत्येकरीता २० लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची निष्पन्न झाले आहे.

सदर गुन्ह्याच्या तपास पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे अन्वेशन विभागाचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील करीत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासन चांगलेच हादरले आहे.